Nation

देवेंद्रजी दिवसेंदिवस आपण नार्सिसिझमच्या ( आत्ममुग्धता ) विकाराचे बळी ठरत आहात का ?

शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या प्रा. सुषमा अंधारे यांची सोशल मिडियावरील पोस्ट सध्या चर्चेत

मुंबई , दि.१०. ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) – सध्या सोशल मिडियावर शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे , ती पोस्ट सध्या चर्चेत आली आहे .

देवेंद्र जी
सस्नेह नमस्कार
विनंती विशेष

आज पुन्हा एकदा सभागृहामध्ये आपले भाषण ऐकले. आम्हाला अपेक्षित होते की महाराष्ट्रातील एकूण कायदा सुव्यवस्था पेपर फुटी , महिला सुरक्षा , आझाद मैदानावर अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी आपापल्या प्रश्नांना घेऊन भर पावसात करत असलेले आंदोलन या सगळ्यांवर आपण बैजवार मांडणी कराल.

पण आपल्या चर्चेचा मुख्य विषय होता तो मिसिंग लिंक.

असायला हरकत नाही कारण एवढा मोठा गवगवा झालेला महत्त्वकांक्षी प्रकल्प जर वादाच्या भोवऱ्यात सापडत असेल तर मुख्यमंत्री म्हणून आपण ती भूमिका मांडणे अतिशय स्वाभाविक आहे.
पण ती भूमिका मांडताना आपण विरोधकांनी विचारलेले प्रश्न खेळकर वृत्तीने घेण्यापेक्षा कुत्ते , भाडे के टट्टू , एक कोटी खोटे बोलणारे लोक मेल्यानंतर अशा खोटारड्यांचा जन्म होतो वगैरे वगैरे संसदीय कामकाजाला अतिशय अशोभनीय भाषा वापरत शेरेबाजी केली. आपली शेरेबाजी अर्थातच आपल्या भक्तांना प्रचंड आवडली असेल. पण हे अतिशय नम्रपणे आपल्या लक्षात आणून दिले पाहिजे की मिसिंग लिंक वर भाष्य करत असताना त्या संपूर्ण मांडणीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अपेक्षित असणारा विवेक “मिसिंग” होता.
महाराष्ट्रभरातील अनेक पक्ष संघटना, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी विचारलेले प्रश्न याचे उत्तर आपण देणे लागतात. आणि ती उत्तर आपण जबाबदारीने देणे अपेक्षित आहे. ना की त्यांना कुत्रे आणि भाड्याचे टट्टू ही भाषा वापरणे.
आपल्याला आठवतं का, 2022 साली आपणच विरोधी पक्ष नेते म्हणून मांडणी करत असताना असे म्हणालात की, ” कृपया सत्ताधाऱ्यांनी हा गैरसमज काढून टाकावा की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात..!”
देवेंद्रजी आता हाच नियम तुम्हाला लागू होत नाही का ?

की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आहात…!

तुम्हाला प्रश्न विचारणे हा महाराष्ट्राचा अपमान कसा होऊ शकतो?
ज्या मिसिंग लिंक वरून दिवसभरात लाखो लोक प्रवास करतात. त्या मिसिंग लिंक वर जर काही अघटीत घडले असते. जीवित हानी झाली असती तर त्याची जबाबदारी कुणाची होती ? आणि लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारूच नयेत असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? मिसिंगचे लोकार्पण सोहळा करताना हा प्रकल्प आपण उभा केला असे म्हणत जर याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ होत असेल तर यात काही दोष निघाले तर ते स्वीकारण्यासाठी तुम्ही मनाचा उमदेपणा का दाखवत नाहीत.
ताशी /250किमी वेगाने वारे वाहिले तरीसुद्धा या प्रकल्पाला धक्काही लागणार नाही हे विधान आपलेच होते ना ? मग एक कोटी खोटे बोलणाऱ्या लोकानंतर कुणाचा जन्म झाला? मग नेमका त्याच संदर्भाने जर प्रश्न विचारला तर बिघडले कुठे ?

कारण या मिसिंग लींक साठी जे ७१२०कोटी रुपये खर्च झाले ते पैसे कुठल्याही एका लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून खर्च केले नाहीत तर ते पैसे महाराष्ट्राच्या जनतेने भरलेली घरपट्टी पाणीपट्टी , रोड टॅक्स, टोल टॅक्स, मालमत्ता कर असे विविध प्रकारचे कर भरलेले आहेत.
आता लोकांच्या पैशातून लोकांसाठी उभा राहिलेला उपक्रम जर लोकांच्या जीवावर बेतेल अशा परिस्थितीत काही घडत असेल तर लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारू नयेत.. ?
लोकांनी प्रश्न विचारल्यावर तुम्ही त्यांना कुत्रे आणि भाडे के टट्टू म्हणाल..!
म्हणजे तुमच्या भोवती सतत फक्त आणि फक्त स्तुतीपाठकांचा गराडा असायला हवा… विरोधक म्हणून तुम्हाला कोणी आरसा दाखवूच नये. अन दाखवला तर तुम्ही त्यांना कुत्रे आणि भाडे की टट्टू म्हणणार ?
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राचा अपमान तर होत नाहीच नाही परंतु एका जबाबदार पदावरची व्यक्ती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणं म्हणजे तरी तुमचा अपमान असं तुम्ही कसं गृहीत धरता.. ?
आणि जर विरोधकांनी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही तर मग अधिवेशन आणि हे सगळे प्रश्न-उत्तर याचा फार्स तरी कशासाठी केला जातो..?
खरंतर आज तुम्ही ज्या त्वेषाने बोलत होतात हा त्वेष , हा आवेग, हा संताप व्यक्त करण्याची जागा आणि वेळ चुकली आहे हे आपल्याला कोणीतरी सांगायची गरज आहे.
महोदय, जेव्हा या राज्याचे आराध्य असणारे आणि या राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या नसानसात वाहणारा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा पुतळा समुद्रकिनारी पडतो तेव्हा खरा महाराष्ट्राचा अपमान होतो. जेव्हा महाराष्ट्राच्या या आराध्या बद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी अपशब्द काढतात, कोरटकर अपमान करतो, तेव्हा तो संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असतो, जेव्हा राज्यामध्ये विविध परीक्षांचे पेपर फुटतात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षण खाते किंवा स्पर्धा परीक्षा घेणारा विभाग यांच्या कार्यक्षमते बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, जेव्हा महाराष्ट्राच्या पवित्र विधिमंडळ परिसरामध्ये आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जातात अर्वाच्य शिवीगाळ करतात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या प्रकाशकाला आईबहिणी वरून शिवीगाळ करतो तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, जेव्हा या महाराष्ट्राची वैचारिक आधारशिला ठेवणारे क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये गरज नसताना लोकप्रतिनिधी म्हणवणारी एखादी महिला जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वडाला प्रदक्षिणा घालते आणि ठरवून क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेचा अवमान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा महाराष्ट्राचा अवमान होतो , जेव्हा जेम्स लेन सारख्या माणसाला इतिहासाचे विद्रूपीकरण करण्यासाठी मा जिजाऊंच्या बद्दल चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न इथला एखादा विघातकी माणूस करतो तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो, जेव्हा तीन तीन चार चार वर्षांच्या निष्पाप कळ्या खुलण्याआधी कुस्करून टाकल्या जातात आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी या राज्याचे गृहखाते अपयशी ठरते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो..!
जेव्हा महाराष्ट्रातील शेकडो महिलांचे लैंगिक शोषण होते आणि त्या संपूर्ण प्रकरणांमध्ये महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाला आपली खुर्ची गमवावी लागते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो.
जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे अपघाती निधन होतं मात्र त्यांचीच एफ आय आर या महाराष्ट्रातलं एकही पोलीस स्टेशन नोंदवून घेत नाही तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो.
जेव्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रग्स चे साठे सापडतात मात्र त्याची पाळमुळं अजूनही खणून काढली जात नाहीत आणि महाराष्ट्राचा उल्लेख “उडता महाराष्ट्र” असा होतो तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो.
जेव्हा महाराष्ट्रातले वेदांत फॉक्सकॉन , टाटा एअर बस बल्क ड्रग पार्क, यासारखे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जातात तेव्हा महाराष्ट्राचा अवमान होतो.
जेव्हा महाराष्ट्रातच मराठी माणसाची जगण्याची कोंडी होते त्याला त्याच्याच राज्यामध्ये राहायला घर देण्यासाठी नाकारल जातं तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो…
महाराष्ट्राचा अपमान झालेले असे अनेक क्षण अशा अनेक घटना ज्यावर आपण अत्यंत त्वेषाने व्यक्त होणे अपेक्षित होते तेव्हा मात्र आपण मूग घेऊन गप्प राहिलात.
आणि आज जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातात तेव्हा मात्र महाराष्ट्र धर्माच्या पांघरूणाआड लपण्याचा आपण प्रयत्न करत आहात हे काही खरे नव्हे…
देवेंद्रजी दिवसेंदिवस आपण नार्सिसिझम (आत्ममुग्धता)
च्या विकाराचे बळी ठरत आहात का ?
अजूनही वेळ गेलेली नाही. सभागृहात विरोधी पक्ष नेताच नको. विरोधी स्वर नको. टिका नको असे कृपया असे असेल तर हे चिंताजनक आहे. हे कुठल्याही द्वेषापोटी किंवा रागापोटी नाही तर अत्यंत सम्यक विचार करत हे मांडत आहे.

आज हे पत्र आवर्जून लिहावेसे वाटले त्याचे कारण आपण सभागृहाच्या पटलावरून ज्या तिरस्कृत , हिणकस पद्धतीने आणि अहंभावाने महाराष्ट्रातील जनतेला कुत्ते आणि भाडे के टट्टू म्हणालात यावरून आपण महाराष्ट्राचा अपमान नक्की केला आहे..
हे महाराष्ट्रासमोर किंवा आपल्या समर्थक स्तुतीपाठकांच्या समोर जरी आपण कधी मान्य केले नाही तरी जेव्हा कधी एकांतात आरशासमोर आपण उभे राहाल तेव्हा निश्चितपणे आपले अंतर्मन मान्य करेल की होय देवेंद्रजी आज आपण सभागृहात महाराष्ट्राचा अपमान केला आहे.. !!
असो. जपा स्वतःला. – प्रा सुषमा अंधारे शिवसेना प्रवक्त्या ( उबाठा गट )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button