कंदलगावात अग्निशामक गाड्यांच्या चालकांचा थरार ; विनाकारण सायरन वाजवल्याने नागरिक संभ्रमित

विनाकारण सायरन वाजवल्याने नागरिक संभ्रमित , डिलिव्हरी गाड्या पोच करण्यासाठी जाताना गावात केली स्टंटबाजी .

दक्षिण सोलापूर , दि २८, कंदलगाव ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
कंदलगाव परिसरात शनिवारी सायंकाळी एका विचित्र आणि संतापजनक प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या दोन नवीन गाड्या डिलिव्हरी साठी घेऊन जाणाऱ्या स्थानिक राहिवासी असलेल्या चालकांनी भरवस्तीत आणि मुख्य चौकात विनाकारण सायरन वाजवून स्टंटबाजी करत प्रशासनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसले.
नेमकी घटना काय घडली.
सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास कंदलगाव एसटी स्टँडच्या मुख्य चौकातून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या कानठळ्या बसवणारे सायरन वाजवत सुसाट वेगाने गेल्या. अचानक झालेल्या या मोठ्या आवाजामुळे परिसरात कुठे मोठी आग लागली आहे की काय? या भीतीने नागरिक संभ्रमित झाले, महामार्गावरील इतर वाहनचालकांमध्येही यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि अपघाताची परस्थिती निर्माण झाली होती.
घटनेचे गांभीर्य पाहून काही जागरूक नागरिकांनी व पत्रकारांनी धाव घेतली असता, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसल्याचे समोर आले. संबंधित दोन चालक कंदलगाव मधील असून कंपनीच्या नवीन गाड्या डिलिव्हरीसाठी घेऊन जात होते. केवळ रस्ता मोकळा मिळवण्यासाठी किंवा मौज म्हणून हे चालक भरवस्तीत आणि महामार्गावर बेदरकारपणे सायरन वाजवत गाड्या दामटत होते.
दरम्यान पोलीस पाटील कैलास कडते यांनी तत्काळ या दोन्ही वाहनचालकांना थांबवून जाब विचारला की “अशा प्रकारे विनाकारण सायरन वाजवून जनतेला भयभीत करू नका,” दोन्ही मुजोर चालकांनी गावच्या पोलीस पाटलांना न जुमानता समज दिल्यानंतरही त्यांनी गाडीचे लाल दिवे आणि जोरदार सायरन सुरूच ठेऊन कामतीच्या दिशेने सुसाट रवाना झाले, दरम्यान दोन्ही वाहनचालक दारू पिल्याची नागरिकात कुजबुज होती.
प्रशासनाकडून कारवाई होणार का?
आपत्कालीन सेवेच्या गाड्यांचा वापर अशा प्रकारे वैयक्तिक करमणुकीसाठी करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकारामुळे कंदलगाव एसटी स्टँड परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित बेजबाबदार चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पाटील कैलास कडते यांनी मंद्रूप पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.



