क्रेन कप्पीचा विद्युत तारेला स्पर्श; क्षणात होत्याचे नव्हते,केशेगावात शेतात काम करताना विजेचा धक्का


तुळजापूर,दि २७.(प्रतिनिधी सुरज थोरात) तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे शनिवारी दुपारी शेतात काम सुरू असताना घडलेल्या भीषण विद्युत दुर्घटनेत बाप–लेकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण केशेगाव परिसरात शोककळा पसरली असून साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.केशेगाव येथील गणपत शिवाजी साखरे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. विहिरीतील पानबुडी पंप बाहेर काढण्यासाठी क्रेन कप्पीच्या सहाय्याने काम केले जात होते. यावेळी क्रेनचा कप्पी अचानक जवळून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यामुळे विद्युत तारेचा प्रचंड करंट थेट क्रेनमध्ये उतरला.या वेळी क्रेनवर काम करत असलेले साखरे कुटुंबातील बाप व लेक तसेच दोन मजूर यांना तीव्र विद्युत धक्का बसला. करंट इतका जबरदस्त होता की चौघेही जागीच कोसळले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांतच आनंदाचे वातावरण भीषण शोकात बदलले.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.या दुर्घटनेत साखरे कुटुंबातील कर्त्या पुरुषासह तरुण लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. निष्काळजीपणा व विद्युत तारा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



