मंद्रुप पोलिसांनी उधळले दोन बालविवाह!


मंद्रुप दि १२ मे, ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप् पोलीस स्टेशन हद्दीत बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांविरोधात मंद्रुप पोलिसांनी कडक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे तसेच बालकल्याण पथकाने अवघ्या एका आठवड्यात दोन बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.
गुप्त माहिती व स्थानिकांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित कुटुंबीयांना कायद्याची जाणीव करून दिली. बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देत दोन्ही विवाह तत्काळ थांबविण्यात आले.
पोलिसांच्या या धाडसी आणि संवेदनशील हस्तक्षेपामुळे दोन अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे.
आजही ग्रामीण भागात परंपरा, सामाजिक दबाव आणि अज्ञानामुळे बालविवाहाच्या घटना घडताना दिसतात. मात्र मंद्रूप पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी ही इतरांसाठी आदर्श ठरत आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास आणि आदर अधिक वाढला असून नागरिकांकडून मंद्रुप पोलिसांचे कौतुक होत आहे.
“बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून मुलांच्या भविष्यावर घाला आहे. अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही,” असा इशारा पोलिस निरीक्षक श्री. शंकर पटवारी यांनी दिला आहे.
मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे आणि बालकल्याण पथक यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे दोन निष्पाप आयुष्यांना नवसंजीवनी मिळाली असून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर,अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर,उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग सोलापूर श्री संकेत देवळेकर सर यांचे मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शंकर पटवारी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद सहा. फौजदार बापू शिंदे पोलीस हवालदार शहानुर मुलानी पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे ज्ञानेश्वर भोसले विशाल कर्नाळकर महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता चव्हाण यांनी केली आहे



