Nation

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व नागनाथ यात्रा शांततेत संपन्न

मोहोळ पोलिसांचे शिस्तबद्ध आणि काटेकोर नियोजन

मोहोळ, दि. 26 [ प्रतिनिधी सचिन गवळी ] : मोहोळ शहर व परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच श्रीक्षेत्र मोहोळ येथील नागनाथ यात्रोत्सव यंदा अभूतपूर्व उत्साह, भक्तिभाव आणि आदर्श शांततेच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. हजारोंच्या संख्येने भाविक व नागरिकांची उपस्थिती असूनही संपूर्ण कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली असून मोहोळकरांच्या सामाजिक जाणीवेची साक्ष देणारी ठरली.
या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोहोळ पोलीस स्टेशनने अत्यंत सूक्ष्म व नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केली होती. पोलीस निरीक्षक बाजीराव पौवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार आढावा बैठका घेत परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण केले. संभाव्य संवेदनशील मुद्द्यांचा वेध घेत योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तसेच नागरिक, आयोजक मंडळे व ग्रामस्थांना वेळोवेळी शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन करण्यात आले. अफवा, गैरसमज किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी जनजागृती मोहीम राबवली. या सर्व प्रयत्नांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस प्रशासनाशी उत्कृष्ट समन्वय साधला.
यात्रा व जयंतीनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र प्रत्येक कार्यक्रमात शिस्त, नियमांचे पालन आणि परस्पर सहकार्य यांचा आदर्श पाहायला मिळाला. परिणामी संपूर्ण शहरात शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक एकात्मतेचे प्रेरणादायी चित्र निर्माण झाले.
या यशस्वी आयोजनामुळे पोलीस प्रशासनाच्या दक्ष, दूरदृष्टीपूर्ण आणि परिणामकारक नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सुसंवाद आणि सहकार्य अधिक दृढ झाल्याचे अधोरेखित झाले. मोहोळकरांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि शांततेचा आदर्श हा इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button