जनसंपर्क ते कार्पोरेट कम्युनिकेशन बदलते संवाद पर्व; राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त प्रा. विठ्ठल एडके यांचा विशेष लेख

राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त प्रा. विठ्ठल एडके यांचा विशेष लेख

सोलापूर ,दि. २१ एप्रिल २०२६, ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव ) प्रत्येक वर्षी 21 एप्रिल रोजी भारतात राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिक शुभेच्छांचा नसून, समाज, सरकार आणि व्यवसाय यांच्यातील संवाद अधिक मजबूत करणार्या जनसंपर्क क्षेत्राच्या योगदानाचा गौरव करण्याचा आहे. एकेकाळी फक्त प्रसिद्धीपुरती मर्यादित असलेली ही शिस्त आता बहुआयामी, धोरणात्मक आणि अत्याधुनिक बनली आहे. जनसंपर्क हे एक शास्त्र आणि कला अशा दोन्ही पद्धतीने विकसित झाले आहे. प्रसारमाध्यमांपासून ते सोशल मीडियापर्यंतच्या या प्रवासात त्याने विश्वासार्हता, त्वरा, पारदर्शकता आणि सहभाग या नवीन परिमाणांना आत्मसात केले आहे. डिजिटल युगात त्याची गरज अधिकच वाढली आहे, कारण माहितीच्या पुरात आता ‘फेक न्यूज’ आणि ‘कन्फर्मेशन बायस’ यांच्यात सत्य शोधणे कठीण झाले आहे. तसेच ‘जनसंपर्क’ ते ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ ही उत्क्रांती दाखवते की हा विषय आता संस्थेच्या निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आला आहे. ज्या संस्था या बदलांशी जुळवून घेतील, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि सर्जनशीलता या मूल्यांवर संवाद साधतील, त्या भविष्यातही यशस्वी राहतील. राष्ट्रीय जनसंपर्क दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रीय जनसंपर्क दिनाची सुरुवात भारतीय जनसंपर्क परिषदेने केली. 21 एप्रिल 1968 रोजी मुंबईत झालेल्या पहिल्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेपासून ही परंपरा सुरू झाली. या परिषदेत देशभरातील जनसंपर्क अधिकार्यांनी एकत्र येऊन या व्यवसायाला व्यावसायिक आणि नैतिक चौकट देण्याचा निर्धार केला. तेव्हापासून 21 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय जनसंपर्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट जनसंपर्क व्यावसायिकांच्या कार्याला अधोरेखित करणे, नैतिक मूल्यांची जपणूक करणे आणि समाजात या क्षेत्राच्या भूमिकेबद्दल जनजागृती करणे हे आहे. हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की पारदर्शी, प्रामाणिक आणि कार्यक्षम संवादाशिवाय कोणतीही संस्था दीर्घकाळ यशस्वी राहू शकत नाही.
जनसंपर्क ही केवळ माहिती देण्याची क्रिया नसून ती विश्वास निर्मितीची प्रक्रिया आहे. कोणत्याही संस्थेची – मग ती सरकारी असो, खाजगी असो किंवा स्वयंसेवी – सर्वप्रथम गरज असते ती सकारात्मक प्रतिमा आणि विश्वासार्हता निर्माण करण्याची. या ठिकाणी जनसंपर्क सक्रीय कार्यरत लागतो. जाहिराती जिथे पैसे देऊन संदेश पोहोचवतात, तिथे जनसंपर्क माध्यमाद्वारे अधिक आत्मीय आणि विश्वासार्ह पद्धतीने संदेश पोहोचवतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीने उत्पादन सुरू केले असल्यास, जर एखाद्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने त्याचे कौतुक केले तर ते थेट जाहिरातीपेक्षा कितीतरी अधिक प्रभावी ठरते. याशिवाय संकट व्यवस्थापन ही जनसंपर्काची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. कोणत्याही संस्थेला अशी परिस्थिती येऊ शकते जेव्हा तिची प्रतिमा धुळीस मिळण्याची शक्यता असते. उत्पादनातील त्रुटी, चुकीचे विधान, आर्थिक घोटाळा इत्यादी. अशा वेळी योग्य संवाद, प्रामाणिकपणा आणि त्वरित प्रतिसाद हेच संस्थेला वाचवू शकते. शिवाय ग्राहक, गुंतवणूकदार, कर्मचारी, सरकारी यंत्रणा आणि समाज अशा विविध भागधारकांशी सलोख्याचे नाते टिकवण्यासाठी जनसंपर्क आवश्यक आहे. थोडक्यात, जनसंपर्क हा संस्थेच्या सर्वांगीण आरोग्यासाठी रक्ताभिसरण प्रणालीप्रमाणे कार्य करतो. गेल्या काही दशकांमध्ये जनसंपर्काचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. पूर्वी जनसंपर्क म्हणजे फक्त पत्रकार परिषदा, प्रेस रिलीज, उद्घाटन समारंभ आणि वर्तमानपत्रातील नोटीस असे मर्यादित क्षेत्र होते. तो प्रामुख्याने एकतर्फी संवाद होता. संस्था माहिती पाठवते आणि माध्यमे ती प्रसारित करतात. प्रेक्षक फक्त श्रोते होते, त्यांना प्रतिक्रिया देण्याचे माध्यम फारसे उपलब्ध नव्हते.
आज मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. प्रेक्षक आता सक्रिय सहभागी झाले आहेत. त्यांना फक्त ऐकून न चालता, ते बोलतात, विचारतात, ट्वीट करतात, शेअर करतात, ब्लॉग लिहितात आणि व्हिडीओ प्रतिसाद देतात. परिणामी, जनसंपर्क एकतर्फी न राहता द्विमार्गी बनला आहे. आता यशस्वी जनसंपर्क मोहीम तीच मानली जाते जी संवादाला प्रेरित करते, संस्था आणि भागधारक यांच्यात संवादाचा सेतू बनते. या बदलामुळे जनसंपर्क व्यावसायिकांना अधिक सर्जनशील, त्वरित आणि प्रामाणिक बनावे लागले आहे. आज बोलण्यापेक्षा ऐकण्यावर अधिक भर दिला जातो, कारण चांगला श्रोताच चांगला संवादक होऊ शकतो.
इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया यांनी जगाला जोडून टाकले आहे. या डिजिटल क्रांतीमध्ये जनसंपर्काची गरज अधिकच तीव्र झाली आहे. कारण, डिजिटल माध्यमांमुळे माहितीचा वेग वाढला आहे, पण त्याचबरोबर अफवा, चुकीची माहिती आणि नकारात्मक बातम्यांचा वेगही अतोनात वाढला आहे. एक ट्वीट, एक फेसबुक पोस्ट किंवा एक व्हिडीओ सेकंदात व्हायरल होऊ शकतो आणि त्या वेगात एक ब्रँडची प्रतिमा उंचावली किंवा पालथा पडू शकते. म्हणूनच डिजिटल युगात जनसंपर्क व्यावसायिकांना सतत सतर्क राहणे भाग आहे. दुसरे म्हणजे, आता पारंपरिक मीडियाबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, ब्लॉगर्स, यूट्यूबर्स यांच्याशीही नाते जोडणे अनिवार्य झाले आहे. या नव्या ‘मतप्रभावकां’ची पोहोच आणि प्रेक्षकांवरील पकड लक्षणीय आहे. त्यामुळे डिजिटल पीआर म्हणजे फक्त प्रेस रिलीज ईमेलने पाठवणे नसून, त्यासाठी विशिष्ट प्रेक्षकवर्गासाठी वेगळे कंटेंट तयार करणे, गुगल अल्गोरिदम समजून घेणे, सोशल मीडिया ट्रेंड्स हाताळणे आणि रिअल-टाइम प्रतिसाद देणे आवश्यक आहे. डेटा अॅनालिटिक्सच्या साहाय्याने आता जनसंपर्क मोहिमांचा परिणाम अचूकपणे मोजता येतो. किती लोकांपर्यंत संदेश पोहोचला, किती एंगेजमेंट झाली, भावना काय आहेत हे सांख्यिकीय पद्धतीने समजते. थोडक्यात, डिजिटल माध्यमांशिवाय आधुनिक जनसंपर्क अपूर्ण आणि अप्रभावी ठरेल.
जनसंपर्काचा प्रवास ‘प्रेस एजंट्री’पासून सुरू झाला, नंतर तो ‘जनसंपर्क’ झाला आणि आता तो ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ या व्यापक आणि धोरणात्मक स्तरावर पोहोचला आहे. कॉर्पोरेट कम्युनिकेशन ही फार मोठी छत्री आहे, ज्यात जनसंपर्क, अंतर्गत संवाद, गुंतवणूकदार संबंध, सरकारी संबंध, ब्रँड व्यवस्थापन, संकट संप्रेषण आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्व अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. कॉर्पोरेट कम्युनिकेशन हा प्रशासकीय स्तरावरील रणनीतिक भागीदार बनला आहे. कंपनीची दृष्टी, त्याची अभिजातता, त्याचे नियम आणि मूल्ये यांचे योग्य अर्थघटन करून ते सर्व भागधारकांपर्यंत पोहोचवणे हे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे कार्य आहे. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी कंपनी विलीनीकरण करते किंवा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करते, तेव्हा कॉर्पोरेट कम्युनिकेशन धोरणात्मक भूमिका बजावते. तसेच, अंतर्गत संवाद हा कॉर्पोरेट कम्युनिकेशनचा एक मोठा भाग बनला आहे. कारण जर कर्मचारीचं ब्रँड अॅम्बेसेडर नसतील तर बाह्य विश्व त्यांच्यावर विश्वास कसा ठेवेल? या प्रवासात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ‘जनसंपर्क’ आणि ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ या संकल्पना अदलाबदल करण्यासारख्या नसल्या, तरी त्या एकमेकीशी जोडलेल्या आहेत. जनसंपर्क हा कॉर्पोरेट कम्युनिकेशनचा एक महत्त्वाचा आणि सर्वात दृश्यमान भाग आहे. योग्य तो समतोल साधून काम केल्यास संस्थेची एकात्मिक प्रतिमा तयार होते. डिजिटल माध्यमे आणि एआय च्या युगात कार्पोरेट कम्युनिकेशनचे महत्व वाढत आहे. विद्यार्थ्यांसाठी कार्पोरेट कम्युनिकेशन हे करिअरचे नविन क्षेत्र उपलब्ध झाले आहे
टीप – ह्या सदराचे लेखन प्रा. विठ्ठल बिरु एडके – मो. नं. 8329839451 – यांनी केले असून ते सध्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे मास कम्युनिकेशन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.



