Nation

तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं ! संपत्तीचा हव्यास शेवटी तीन जीवांवर बेतला !

निर्दयी दिराने भावजयीसह दोन मुलांची केली निर्घृण हत्या !

सोलापूर दि. २ मे, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ): आज सकाळीच सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून, या दुर्दैवी तिहेरी हत्याकांडामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गाव अक्षरशः हादरून गेले आहे. आई आणि तिच्या दोन मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे  हत्या करण्यात आल्याची  घटना आज सकाळी  उघडकीस आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरामणी गावातील मस्के कुटुंबीयांची तीन घरे एकमेकांच्या शेजारी आहेत. मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची १२ वीतील मुलगी प्रिया (वय १८) आणि दहावीतील मुलगा शिवराय (वय १६) हे तिघे राहत होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास दिराने घराच्या गच्चीवर प्रवेश करून झोपेत असलेल्या तिघांवर तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

या हल्ल्यात गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह गच्चीवरच आढळून आला, तर शिवरायचा मृतदेह घराच्या बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केले आहे. ठसे तज्ञ, गुन्हे शाखा आणि अन्य पथके तपासासाठी दाखल झाली असून पंचनामा करून मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. शेजारी सख्ख्या दिरांचे घर असल्याने शेतजमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

पतीच्या निधनानंतर तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांचा सांभाळ

सुधाकर मस्के यांच्या निधनानंतर गायत्री मस्के यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ तळहाताच्या फोडाप्रमाणे केला. मात्र काका पप्पू म्हस्के सोबत संपत्तीचा वाद सुरू होता. प्रिया तिने बारावीच्या परीक्षेत चांगला अभ्यास केला तर शिवराज याने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेतले. त्याला दहावीत 61.82 गुण मिळाले होते. मात्र आज प्रिया हिचा बारावीचा निकाल होता. प्रियाला 68.83% मिळाले होते. तर उद्या तिचा नीटचा पेपर होता. ह्या घटनेमुळे एकाच वेळी तीन जीव गमावले गेले असून, एका होतकरू मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिल्याची गावात चर्चा होती . बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्हा या घटनेने हादरला आहे.

या भीषण घटनेमुळे बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे , लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button