शेतीच्या वादातून महिलेवर प्राणघातक हल्ला, प्रकरणाला चोरीचा बनाव !,

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील घटना

कंदलगांव, दि २१ जुलै, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथे 16 जुलै रोजी रात्री शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. सुरुवातीला चोरीचा बनाव करण्यात आला होता, मात्र तपासात वेगळेच कारण समोर आले आहे. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
गावडेवाडी येथे शेतातील वस्तीमध्ये राहणाऱ्या 40 ते 45 वर्षीय महिला सोमवारी रात्री घरात एकट्याच होत्या. रात्री 9:30 च्या सुमारास एक नातेवाईक व्यक्ती “वडिलांसोबत भांडण झाले आहे, आज इथेच झोपतो” असे सांगून घराच्या व्हरांड्यात झोपला होता. महिला घरात टीव्ही पाहून झोपली होती.
पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान महिलेच्या डोक्यात कोणीतरी दगडाने जोरात मारले. या धक्क्यात ती बेशुद्ध झाली. पहाटे जाग आल्यावर तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. मात्र अशक्तपणा आणि दुखापतीमुळे तिला उठताही येत नव्हते. घरात तिचा मोबाईलही सापडला नसल्याने सुरुवातीला चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जुलै रोजी संध्याकाळी तिचे दोन मुले आजीकडे गेले असताना गावातील काही नागरिकांनी त्यांना फोन करून माहिती दिली. घरी गेल्यानंतर त्यांना आई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत
पोलिसांना दिलेल्या जबाबात फिर्यादी मुलाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून वडिलोपार्जित शेतीतील काही हिस्सा आईच्या नावावर करावा या कारणावरून घरात वाद सुरू होता. तसेच काही दिवसांपूर्वी आईने एका नातेवाईकाला 2 तोळे सोने हातउसने दिले होते. या सर्व कारणांमुळे हा हल्ला झाला असावा असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. जबर मार लागल्यामुळे सदर महिला काहीच बोलू शकली नाही. या प्रकरणी फिर्यादीच्या जबाबावरून मंद्रूप पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे हे करीत आहेत.
या घटनेमुळे गावडेवाडी परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.



