Nation

केंद्र शासनाच्या नमस्ते योजनेअंतर्गत कचरा वेचक महिलांना सुरक्षा साहित्य संचाचे वाटप

 सोलापूर, दि. १४ जुलै, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) सोलापूर महापालिकेच्या वतीने 14 जुलै हा नमस्ते दिन म्हणून  साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून  केंद्र शासनाचा नमस्ते योजनेखाली कचरा वेचक अशा 293 महिलांना सुरक्षा साहित्य संच वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त मा. विणा पवार, स्थापत्य समितीचे सभापती मा. विजय चिप्पा, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक शंकर चौगुले, सार्वजनिक आरोग्य अभियंता चौबे, उपअभियंता पेंटर, सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे, सफाई  अधीक्षक (वाहन) वासुदेव नरिमेटला, सावित्री महिला संघटनेच्या शकुंतला सूर्यवंशी, जयंती कदम, सुमित्रा देशमुख, परिसर भगिनी विकास संघाच्या प्रमिला जाधव, बाळासाहेब रणदिवे, हेमा मैलारी, वर्षा गट्टू, वैभव कसबे, पूजा सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी  परिसर भगिनी विकास संघाच्या सोलापूर येथील कार्यकर्त्या प्रमिला जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या,  ‘कचरा वेचक महिला या रोज सकाळी कचरा वेचण्यासाठी घराबाहेर पडतात.ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता आपले काम दुपारपर्यंत संपवून त्या पुन्हा संध्याकाळी हॉटेल अथवा केटरिंग मध्ये कामास जातात. त्यांचा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुरू असलेला हा संघर्ष अतुलनीय असा आहे. आता नमस्ते योजनेअंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळण्यासाठी  आयुष्यमान कार्ड देखील त्यांना या योजनेतून मिळणार आहे. यामुळे या महिलांचे कष्ट कमी होणार आहेत. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सांगितले की, ‘आपणास मिळत असलेले सुरक्षा साहित्य वापरावे. कचरा वेचक आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी नमस्ते योजना तयार केल्याबद्दल त्यांनी  केंद्र शासनाचे  विशेष आभार मानले.”

   याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विणा पवार म्हणाल्या ‘परिसर भगिनी विकास संघाच्या वतीने सोलापूर शहरातील कचरा वेचकांचा  केंद्राच्या नमस्ते योजनेसाठी सर्वे करण्यात आला. या सर्वे मध्ये आत्तापर्यंत ८३० कचरा वेचकांची नोंदणी झाली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात  २९३ कचरा वेचकांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. कचरा वेचक महिलांनी  आपल्या मुलांना शिक्षण द्यावे. मुलांवर उत्तम संस्कार करुन सुजाण नागरिक घडवण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या आरोग्याचीही  काळजी घ्यावी.’

स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा यांनी सांगितले की, ” कचरा वेचक महिला या सोलापूर शहरातील  उघड्यावर पडलेला कचरा उचलतात, त्यामुळे पावसाळ्यात ड्रेनेज तुंबत नाहीत. एक प्रकारे त्या  महापालिकेचेच काम करतात. यानिमित्ताने त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.’

   यावेळी नगरसेवक शंकर चौगुले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सोलापूर शहरातील असंघटित  कचरा वेचकांना नमस्ते योजनेचे फायदे मिळावेत यासाठी चिकाटीने पाठपुरावा करणाऱ्या एडवोकेट सरिता मोकाशी यांनी अमेरिकेवरुन पाठवलेला संदेश शकुंतला सूर्यवंशी यांनी वाचून दाखवला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मारम्मा कुमार , संगीता भंडारे, आशा बुगले, सोनाबाई बजारे, लक्ष्मीबाई भंडारे, नरसम्मा भोजे या कचरा वेचक महिलांना आणि भाग्यम्मा भूमपागा,गणेश गायकवाड,रामचंद्र चिनकेरी, अविनाश कांबळे, जेटप्पा कटके या महापालिका कर्मचाऱ्यांना   सुरक्षा साहित्य संचाचे आणि आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. त्यानंतर २९३ कचरा वेचकांना सुरक्षा साहित्याचे वाटप परिसर भगिनी विकास संघ  या संस्थेच्या आणि सोलापूर महापालीकेच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.  किशोर जाधव यांनी केले तर आभार हेमा मैलारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button