Nation
Trending

मूकनायक : मूक समाजाच्या क्रांतीचा हुंकार - प्रा. विठ्ठल बिरू एडके

सोलापूर,दि.३१ जानेवारी,(प्रतिनिधी)

मूकनायक : मूक समाजाच्या क्रांतीचा हुंकार – प्रा. विठ्ठल बिरू एडके. भारतीय समाजव्यवस्थेच्या इतिहासात ३१ जानेवारी १९२० हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात केली. हे केवळ एक वृत्तपत्र नव्हते, तर हजारो वर्षांपासून गुलामगिरीत खितपत पडलेल्या, ज्यांना बोलण्याचा अधिकार नाकारला गेला होता, अशा ‘मूक’ समाजाला आवाज देणारे एक वैचारिक शस्त्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मूकनायक सुरू करण्याचा विचार करत होते, तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संसाधने कमी होती. अशा वेळी कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी २५०० रुपयांची मदत करून या कार्यात मोलाचा वाटा उचलला. बाबासाहेब त्यावेळी सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे सरकारी नोकरीच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी स्वतः संपादक पद न स्वीकारता पांडुरंग नथुराम भटकर यांची संपादक म्हणून नियुक्ती केली. मात्र, या वृत्तपत्राचा आत्मा, त्यातील विचार आणि अग्रलेख हे सर्वस्व बाबासाहेबांचेच होते. ‘मूकनायक’च्या पहिल्या अंकातील अग्रलेखातून बाबासाहेबांनी त्यांचे प्रखर सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञान मांडले. त्यांच्या लेखणीतून उमटलेले विचार आजही मार्गदर्शक ठरतात. बाबासाहेबांनी हिंदू समाजव्यवस्थेचे वर्णन एका ‘बहुमजली मनोऱ्यासारखे’ केले होते. या मनोऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याला मजल्यांनुसार शिड्या नव्हत्या. जो ज्या मजल्यावर (जातीत) जन्माला आला, त्याला तिथेच मरावे लागत असे. एका जातीचा दुसऱ्या जातीशी संवाद किंवा संबंध नव्हता. ही सामाजिक विषमता नष्ट करणे हे मूकनायकचे मुख्य ध्येय होते. बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की, जोपर्यंत समाजात सामाजिक समता येत नाही, तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला किंवा लोकशाहीला काहीही अर्थ नाही. त्यांनी ठणकावून सांगितले की, ज्याला स्वतःचे दुःख मांडता येत नाही, तो प्रगती करू शकत नाही. ही जाणीव त्यांनी शोषित वर्गात निर्माण केली. मूकनायकने दलितांमध्ये ‘स्व’ची जाणीव करून दिली. आपली गुलामगिरी मोडून काढण्यासाठी कोणत्याही अवताराची वाट न बघता स्वतःच संघर्ष केला पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या मंत्राची बीजे मूकनायकच्या माध्यमातून पेरली गेली. मूकनायकच्या शीर्षकावर संत तुकाराम महाराजांचे अभंग छापलेले असतकाय करू आता धरूनिया भीड | निःशंक हे तोंड वाजविले || नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण | सार्थक लावूनि नव्हे हित ||याचा अर्थ असा की, आता कोणाचीही पर्वा न करता, लोक काय म्हणतील याची भीती न बाळगता मी सत्यासाठी आवाज उठवणार आहे. हे ब्रीदवाक्य मूकनायकच्या लढवय्या वृत्तीचे दर्शन घडवते. मूकनायक जरी केवळ अडीच वर्षे चालले असले, तरी त्याने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला. या वृत्तपत्राने दलित समाजाला संघटित केले आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. मूकनायकने केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. आजही मूकनायकचे तत्त्वज्ञान सामाजिक न्याय आणि समतेच्या लढाईत दीपस्तंभासारखे कार्य करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button