

सोलापूर दि. ०२ एप्रिल ( द लोकतंत्र नेशन नेटवर्क ) सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील कार्यकाळात प्रशासनातील विविध उपक्रम राबविताना विकासकामांना गती दिली. विशेषतः महसूल, आपत्ती व्यवस्थापन, तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमता वाढल्याचे मानले जाते.
तब्बल पावणेतीन वर्ष सोलापूरचे कामकाज पाहताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात सेवा बजावली आहेत. आषाढी वारी यशस्वी करताना सोलापूरचे विमानतळचा प्रश्न त्यांनी सोडवून विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सीना नदीला आलेला महापूर त्यांनी संवेदनशीलपणे हाताळला. त्याचबरोबर आयटी पार्क साठी ही त्यांनी झोकून देऊन काम केले. यासह प्रशासनामध्ये शिस्त लावली. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळत तो शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला आहे.
कार्तिकेयन हे २०२० बॅचचे भाप्रसे आधिकारी आहेत. याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल (Chartered accountant) आहेत. सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.
दरम्यान, नवनियुक्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना विविध विकासकामे प्रभावीपणे राबवली आहेत. ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत त्यांचा अनुभव सोलापूर जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बदल्यांमुळे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनिक पातळीवर नवी ऊर्जा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नव्या जिल्हाधिकाऱ्यांकडून विकासकामांना अधिक गती मिळेल, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे.



