Nation
Trending

‘तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’, ‘शून्य थकबाकी’ला प्राधान्य द्या. महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचे आढावा बैठकीत निर्देश

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचे सोलापूर येथे आढावा बैठकीत निर्देश


सोलापूर, दि. ०९ एप्रिल २०२६ ( द लोकतंत्र नेशन नेटवर्क): वीज क्षेत्रात काल केलेल्या कामगिरीवर आज तगू शकत नाही. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली तरीही चालू आर्थिक वर्षामध्ये अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या ‘तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’ व वीजबिलांची ‘शून्य थकबाकी’ या त्रिसूत्रीला प्राधान्य देण्यामध्ये सातत्य ठेवावे असे निर्देश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी दिले.
सोलापूर येथे बुधवारी (दि. ८) सोलापूर मंडल अंतर्गत विभाग व उपविभागांतील ग्राहकसेवेसह ग्राहकसेवेसह मागील वर्षात केलेल्या विविध कामांचा संचालक श्री. पवार यांनी आढावा घेतला व त्यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या. यावेळी व्यासपीठावर बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर, सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक श्री. राजेंद्र पवार म्हणाले, राज्याच्या ऊर्जा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीने राज्याच्या वीज क्षेत्रात क्रांतिकारी आणि सकारात्मक लोकाभिमुख बदल घडून येत आहेत. हे बदल महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि वीज ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा देण्यासाठी नव्याने सज्ज करणारे असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
वीज क्षेत्रात काल केलेल्या कामगिरीवर आज तगू शकत नाही, हे कठोर वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. त्यामुळे तत्पर व दर्जेदार ग्राहक सेवा देण्यासोबतच विविध उपाययोजनांच्या माध्यमातून महावितरणचा महसूल आणखी वाढवणे आणि वीजबिलांची थकबाकी शून्य करण्यास प्राधान्य देऊन प्रत्येक कार्यालयाचे दैनंदिन कामकाज अधिक गतिमान व प्रभावी करावे, असे निर्देश संचालक श्री. पवार यांनी दिले.
या कार्यक्रमात सोलापूर मंडल अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंढरपूर विभाग कार्यालय तसेच मंगळवेढा उपविभाग (प्रथम), अक्कलकोट-२ (द्वितीय) आणि नातेपुते उपविभाग (तृतीय) कार्यालयांचे अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच तीन उत्कृष्ट शाखा अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता श्री. आशिष खेडीकर व व्यवस्थापक (मानव संसाधन) सौ. मृदुला पाटील यांनी केले. तर कार्यकारी अभियंता (प्रशासन) श्री. संपत गावडे यांनी आभार मानले. यावेळी मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो नेम – Solapur MSEDCL Photo 09-04-2026
फोटो ओळ – सोलापूर मंडल अंतर्गत विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग व उपविभाग तसेच अधिकाऱ्यांचा संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता श्री. सुनील माने उपस्थित होते.

आदरणीय संचालक मा. श्री. राजेंद्रजी पवार साहेबांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. मा.साहेबांच्या  साधेपणा, प्रत्येक कर्मचाऱ्यांशी आपुलकीने संवाद साधण्याची त्यांची शैली आणि सर्वांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपणारा स्वभाव मनाला नेहमीच भावतो. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वातून आम्हा सर्वांना सतत नवी ऊर्जा, विश्वास आणि कामाची उमेद मिळत असते. हा सन्मानाचा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील. – सौ. माधुरी चोपडे – उप कार्यकारी अभियंता महावितरण मंडल कार्यालय सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button