Nation
Trending

तामलवाडी पोलिसांची जोरदार कार्यवाही; जनावर चोरीचे प्रकरण उघड, तीन आरोपी अटकेत.

जनावर चोरीचे प्रकरण उघड, तीन आरोपी अटकेत.

तुळजापूर | प्रतिनिधी सुरज थोरात

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या जनावर चोरीच्या गुन्ह्याचा तामलवाडी पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील मास्टरमाइंडसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच चोरीतील जनावरे, विक्रीची रक्कम व वाहन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नांदुर्दी येथून तीन म्हशी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील एक म्हैस लातूर येथील मोहोल साजिद कुरेशी याला विकल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक करत विक्रीची रक्कम जप्त केली.

तसेच आरोपी अनीम निजाम सय्यद (रा. सावरगाव) याच्याकडून दोन म्हशी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन आरोपी निलेश नागनाथ तावडे (रा. सावरगाव) याचे असल्याचे तपासात उघड झाले. या कारवाईत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, अनीम निजाम सय्यद हा सराईत जनावर चोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे यांच्यासह तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

जनावर चोरांवर तामलवाडी पोलिसांचा वचक कायम असून, गुन्हेगारांना थेट आळा घालण्याचा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button