

नळदुर्ग दि . २४ ( सूरज थोरात जिल्हा प्रतिनिधी ) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नळदुर्गमध्ये उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. भाजप तर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. बसवराज धरणे यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांचा प्रचार उत्साहात फडकला. मोठ्या मताधिक्याने विजयी करून नळदुर्गच्या विकासाला निर्णायक गती द्या, असे आवाहन पक्षनेत्यांनी मतदारांना केले.
ऐतिहासिक नळदुर्गमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या विकासकामांनी शहराचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. निझामच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे मानकरी असलेल्या या शहराला दीर्घकाळ प्रशासनिक व आर्थिक स्थिरतेचा अभाव जाणवत होता. मात्र आता शासनाच्या लक्षवेधी योजनांमुळे नळदुर्ग पुन्हा प्रगतीच्या मार्गावर परतताना दिसत आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आणि परिसरातील नव्या सुविधा शहराच्या ओळखीला नवे आयाम देत आहेत. बसवस्मृती, महात्मा बसवराज धरणे पुतळा, साऊंड अँड लाईट शो, ध्यानेंद्र, शहीद बच्छ्तरसिंह व स्व. वसंतराव नाईक स्मारक या उपक्रमांमुळे नळदुर्ग इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाचे उभरते केंद्र बनले आहे.
नगरपरिषद क्षेत्रात ८४ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प सध्या गतीने कार्यान्वित होत आहे. शहर रस्ते, ड्रेनेज, पथदिवे आदी मूलभूत सुविधांसाठी मंजूर झालेल्या १५० कोटींच्या निधीपैकी अनेक कामांना गती मिळाली आहे. नव्या महामार्गांचे काम जोरात सुरू असून व्यापार आणि वाहतुकीसाठी नवे मार्ग खुलत आहेत. रोजगारनिर्मितीसाठी हॉटेल, एमआयडीसीचे प्रक्रियात्मक काम तसेच मुस्लिम बांधवांसाठी आधुनिक शादिमहालाची उभारणीही मार्गावर आहे.
दशकांपासून रखडलेला कुरनूर पाणीप्रकल्प मार्गी लागल्यानंतर ३,५०० हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जागा निश्चित झाल्याने शेतकऱ्यांसाठी नळदुर्ग महत्त्वाचे व्यापारकेंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्वतंत्र तालुक्याची ५० वर्षांची मागणी पूर्ण होत असून अप्पर तहसील कार्यालयातून प्रशासनिक कामकाजाचा वेग वाढला आहे. महावितरणचे नवीन उपविभागीय कार्यालय मंजूर झाल्याने विजेच्या सोयीसुविधाही सुधारतील.
प्रचाराच्या शुभारंभी भाजप पदाधिकाऱ्यांनी, “नळदुर्गची विकासयात्रा आता थांबणारी नाही. जनता बदल अनुभवत आहे आणि हा बदल कायमस्वरूपी राहील,” असे ठामपणे सांगितले. आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनीच नळदुर्गच्या प्रगतीला गती देऊ शकतील, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला





