Nation
Trending

बोरामणी नाका येथे भीषण अपघात;दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू

दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू

सोलापूर दिनांक २७ मार्च, ( द लोकतंत्र नेशन नेटवर्क) सोलापूरमध्ये आज घडलेली ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक ठरली आहे. बोरामणी नाका येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.मृतांची नावे सैफन शेखफरीद पटेल (वय ४०) आणि हुजूर अलाउद्दीन पटेल (वय ३६) अशी असून, दोघेही बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी होते. दोघेही भटारी काम करून उदरनिर्वाह करत होते. एका ऑर्डरसाठी सोलापुरात आले असताना हा अपघात झाला. ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर त्यांना तत्काळ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सैफन पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, पाच बहिणी, तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. तर हुजूर पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. या अपघातामुळे शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संतप्त नागरिकांनी “अजून किती जणांचा बळी जाणार?” असा सवाल उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही जड वाहन चालक मोठ्या आवाजात गाणी लावून वाहन चालवतात, त्यामुळे आजूबाजूचा इशारा ऐकू येत नाही आणि अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे अशा वाहनांवर नियंत्रण आणावे आणि शहरात जड वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे.या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button