Nation
Trending

पदापेक्षा माणुसकी श्रेष्ठ ! जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा संवेदनशील नेतृत्वाचा आदर्श

धाराशिव, दि. ३ फेब्रुवारी(प्रतिनिधी:सुरज थोरात) – प्रशासनातील पद, अधिकार आणि शासकीय चौकटींपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा एक भावस्पर्शी प्रसंग २ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे अनुभवायला मिळाला. जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील, आपुलकीच्या आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली.जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीय सहाय्यक श्री. दत्तात्रय कुलकर्णी हे तब्बल ३५ वर्षांची प्रदीर्घ व निष्ठावान सेवा पूर्ण करून २ फेब्रुवारी रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने व समर्पित भावनेने प्रशासनाची जबाबदारी पार पाडली. अशा कर्मचाऱ्याचा सन्मान केवळ औपचारिक न राहता मनापासूनचा असावा, याचे जिवंत उदाहरण जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी घालून दिले.सेवापूर्ती कार्यक्रमानंतर सायंकाळी सुमारे ७.३० वाजता जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी एक अत्यंत भावस्पर्शी निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या शासकीय वाहनात सेवानिवृत्त स्वीय सहाय्यक श्री. कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक स्वतःच्या आसनावर बसवले, तर स्वतः वाहनातील समोरील सुरक्षा रक्षकाच्या जागेवर बसून त्यांना त्यांच्या निवासस्थानी सुखरूप पोहोचवले. त्यानंतरच जिल्हाधिकारी आपल्या शासकीय निवासस्थानी परतले.हा प्रसंग केवळ एक औपचारिक निरोप नव्हता, तर अधिकारी–कर्मचारी नात्यातील जिव्हाळा, प्रामाणिक सेवेचा सन्मान आणि नेतृत्वाची खरी व्याख्या अधोरेखित करणारा क्षण ठरला. अधिकारी असूनही कर्मचाऱ्यांवर कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम करणारे, त्यांच्या कार्याचा आदर राखणारे आणि माणुसकी जपणारे नेतृत्व म्हणून जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार यांनी अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.अशा संवेदनशील, माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या नेतृत्वाला सर्व स्तरातून कौतुकाची दाद दिली जात आहे.बातमी यांच्या सौजन्याने DIO धाराशिव कार्यालय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button