
शहर विकासाच्या नवदृष्टीसह आत्मविश्वासपूर्ण पाऊल
मोहोळ दि. १६ [ तालुका प्रतिनिधी सचिन गवळी ] : मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृढ निश्चयातून सौ. प्रीतीताई घाडगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष अत्यंत उत्साहात व आत्मविश्वासाने दाखल केला त्यांच्या प्रवेशामुळे मोहोळच्या राजकारणात नवी उमेद आणि सकारात्मकतेची ऊर्जा संचारली आहे.
सौ. घाडगे या मोहोळमधील सर्वश्रुत, लोकांशी घट्ट नाळ जोडलेल्या आणि सामाजिक कार्याची समृद्ध परंपरा जपणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. शांत, संयमी आणि प्रामाणिक स्वभावामुळे अनेकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या प्रीतीताई यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांच्या मनात दृढ स्थान निर्माण केले आहे. विशेषतः महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचे व्यापक कौतुक होत आहे.
महिलांशी असलेला त्यांचा प्रेमळ, आपुलकीचा आणि संवेदनशीलतेचा संवाद हा त्यांचा वेगळेपणा ठरतो. अनेक महिलांसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत. शहरातील विविध घटकांशी सातत्याने संवाद साधत, समस्या जाणून घेत आणि त्यावर वेगाने उपाय शोधण्याच्या त्यांच्या शैलीमुळे मोहोळकरांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना अधिक दृढ झाली आहे.
नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करताना सौ. प्रीतीताई घाडगे यांनी सांगितले की, “मोहोळ शहराचे नियोजनबद्ध, आधुनिक आणि सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी मी अर्ज दाखल केला आहे.
नागरिकांनी दिलेल्या प्रेम व विश्वासाच्या जोरावर मोहोळचा विकास हेच माझे ध्येय राहील.” त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत नवचैतन्य निर्माण झाले असून, मोहोळ शहराच्या विकासासाठी त्यांचे पाऊल ठोस आणि दिशादर्शक ठरणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
मोहोळच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रीतीताईंचे हे पाऊल निर्णायक ठरेल, अशी व्यापक प्रतिक्रिया शहरभरातून उमटत आहे.
चौकट : “मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या कामांना प्राधान्य देण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सुरक्षितता यांसाठी ठोस उपाययोजना करणे हा माझा प्रमुख हेतू आहे.”… प्रीती घाडगे




