Nation

ओला दुष्काळ जाहीर करा – खा.ओमराजे निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, खासदार-आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

धाराशिव, दि. २४ 🙁 प्रतिनिधी सूरज थोरात )
ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून नद्या-नाले तुडुंब भरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, भुईमूग, फळबागा व ऊस यांसारखी नगदी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या परिस्थितीचा तातडीने आढावा घेण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समोर ठेवत त्यांनी मुख्यमंत्रींकडे विविध मागण्या सादर केल्या. शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न बिकट झाला असल्याने त्वरीत मदत द्यावी, अशी ठाम मागणी लोकप्रतिनिधींनी केली.


प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

  1. ओला दुष्काळ जाहीर करावा – राज्याने तातडीने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी.
  2. संपूर्ण कर्जमाफी करावी – नुकसानीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.
  3. पीक विमा निकष बदलावे – प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अन्यायकारक अटी रद्द करून जुन्या निकषांनुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळावी.
  4. तातडीची मदत द्यावी – मिरज व कोल्हापूर येथे पूरस्थितीनंतर जशी मदत देण्यात आली होती, तशीच मदत या भागातील शेतकऱ्यांना द्यावी.
  5. पायाभूत सुविधा दुरुस्ती – अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते, पूल, बांधारे तसेच वीज वितरण कंपनीचे रोहित्र व खांब दुरुस्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावा.
  6. जमीन खचलेल्यांना मदत – शेतकऱ्यांची जमीन खचल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई करावी व बहुभुजधारक शेतकऱ्यांचाही यात समावेश करावा.
  7. पशुधन नुकसान भरपाई – पुरात वाहून गेलेल्या जनावरांची बाजारभावानुसार नुकसानभरपाई द्यावी.
  8. घर व गोठे पडलेल्यांना मदत – ज्यांची घरे व गोठे पडले आहेत, त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
  9. प्रति हेक्टर ५० हजार मदत – पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी.

शेतकऱ्यांची बिकट अवस्था

अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचेच नव्हे तर शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोठारात साठवलेले धान्य वाचले नाही, तर जनावरांचे चारा संकट अधिक तीव्र झाले आहे. आधीच कर्जबाजारी असलेले शेतकरी आता पिकाच्या खर्चामुळे अधिक अडचणीत सापडले आहेत.


लोकप्रतिनिधींची ठाम भूमिका

खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांचे निवेदन सादर करताना स्पष्ट केले की, “सरकार जर तातडीने मदत केली नाही, तर शेतकऱ्यांचे जगणे कठीण होईल. ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button