Nation

२८ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप ;

भंडारकवठे जीवन विकास प्रशालेचा स्तुत्य उपक्रम

कंदलगाव , दि. ४ ऑगस्ट (प्रतिनिधी – राहुल उडाणशिव ) ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच दूरवरून शाळेत ये-जा करण्याचा त्रास कमी व्हावा, या सामाजिक उद्देशाने जीवन विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, भंडारकवठे यांच्या वतीने २८ विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मंगळवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अण्णाराव कारभारी सावकार होते. तर माजी पर्यवेक्षक, हरीभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथील मोतीबने सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक दिवंगत शी. कमळे गुरुजी व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्राचार्य पी. एम. कमळे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत सायकल वाटपामागील उद्देश स्पष्ट केला. तेलगाव, बाळगी, आनंदनगर तसेच वाडी-वस्तीवरून येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या सायकलींचे वितरण करण्यात आले.

प्रमुख पाहुणे मोतीबने सर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. तसेच संस्थापक कमळे गुरुजी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा प्रेरणादायी संदेश दिला.

संस्थेचे सचिव एम. डी. कमळे यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांचे समर्पित कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या नवोपक्रमांची माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी खजिनदार व्ही. के. पाटील, विश्वस्त नागेश बिराजदार, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर सावकार, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बसवराज मुक्काणे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवपुत्र जेऊरे यांनी केले, तर पी. एफ. कुगणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button