
MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

पंढरपूर (प्रतिनिधी ) शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी MPDA कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शरद कोळी यांना एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.शरद कोळी यांच्याविरोधात MPDA कायद्यानुसार कारवाईचे आदेश १७ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले होते. आदेश जारी झाल्यानंतर शरद कोळी हे फरार होते दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सांगली येथे कारवाई करत शरद कोळी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.शरद विठ्ठल कोळी, वय ३७ वर्षे, रा. अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर, यांच्यावर वाळू चोरी, खंडणीची मागणी आणि प्रक्षोभक वक्तव्यांसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती तसेच इतर विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या कायद्यातील कलम ३(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार आणि त्यांच्या पथकाने केली.


