Nation
Trending

जुनोनी-वलगुड रस्त्यावर स्कूल बसला अपघात विद्यार्थी बाल-बाल बचावले

धाराशिव, दिनांक ५,(प्रतिनिधी सुरज थोरात) धाराशिव जिल्ह्यातील जुनोनी ते वलगूड या मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका भरधाव इंडिका कारने शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील २५ ते ३० विद्यार्थी बाल-बाल बचावले असून, केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी इंडिका चालकाच्या बेजबाबदारपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जुनोनीकडून वलगूडच्या दिशेने स्कूल बस जात होती. याच दरम्यान समोरून येणाऱ्या एका इंडिका कारचा वेग अत्यंत जास्त होता. जुनोनी-वलगुड रस्त्यावरील एका धोकादायक वळणावर इंडिका चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्ता अरुंद असल्याने आणि कारचा वेग मर्यादेबाहेर असल्याने, चालकाला गाडी सावरता आली नाही आणि ती थेट स्कूल बसला जाऊन धडकली.धडक बसताच बसमधील चिमुरड्यांनी एकच हंबरडा फोडला. बसमध्ये सुमारे २५ ते ३० विद्यार्थी प्रवास करत होते. धडकेमुळे बस रस्त्याच्या कडेला काही अंशी झुकली, मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिका कारचा वेग इतका प्रचंड होता की वळणावर ती गाडी हवेत उसळल्यासारखी वाटत होती. “रस्ता अरुंद आहे हे माहीत असूनही चालक गाडी पळवत होता, त्याला वळण घेताच आले नाही,” असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी इंडिका चालकाला जाब विचारला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून इंडिकाच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.जुनोनी-वलगुड हा रस्ता सध्या अत्यंत अरुंद अवस्थेत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे आणि तीव्र वळणे यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यातच वाहनांचा वाढलेला वेग या मार्गावर मृत्यूचा सापळा बनत आहे.घटनेची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलांना सुखरूप पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला, या मार्गावर तातडीने गतिरोधक बसवण्यात यावेत आणि वेगाने गाड्या चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button