गावठी पिस्तूल बाळगणे मंजुनाथच्या अंगलट ;

विजापूर नाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या , १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर, दि २०, ऑगस्ट ( प्रतिनिधी ) : विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुस, दोन मोबाईल आणि एक मोटरसायकल असा एकूण १,३६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१९ ऑगस्ट रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शितलकुमार गायकवाड व त्यांचे पथक कर्तव्यावर हजर असताना, पथकास गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, “विजापूर ते सोलापूर कडे स्प्लेंडर प्लस मोटर सायकल क्र. KA28HF2336 यावर एक इसम ग्रे रंगाचे टी-शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला असून त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस आहे.”
या माहितीवरून सपोनि शितलकुमार गायकवाड यांनी वरिष्ठांना कल्पना देऊन, पंचासह कारवाईसाठी रवाना झाले. पहाटे ०२:२६ वा. च्या सुमारास संशयित इसम मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी, वय ३९ वर्षे, व्यवसाय – खाजगी नोकरी, रा. मु.पो. शांतेश्वर गल्ली, इंडी ग्रामीण, ता. इंडी, जि. विजापूर (कर्नाटक) यास नवीन विजापूर नाका, जलशुद्धीकरण केंद्र, सोलापूर येथून ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी बॉडी असलेले गावठी पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४५५/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
पोलीस कोठडीत आरोपी मंजुनाथकडे चौकशी केली असता, सदर पिस्तूल व काडतुसे कुठून आणली याबाबत विचारले असता त्याने ती इंडी येथील त्याचा मित्र धनश्याम दल्लीचंद जाट, वय २७ वर्षे, व्यवसाय – आईस्क्रीम विक्री, कायम रा. सातालियास भिलवाड, राज्य – राजस्थान, सध्या रा. बिरप्पा नगर, (तांब्याच्या घरी भाड्याने) ता. इंडी, जि. विजापूर (कर्नाटक) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी इंडी येथे जाऊन धनश्याम जाट यास ताब्यात घेऊन या गुन्ह्याच्या तपासकामी दि. २० ऑगस्ट रोजी अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी कुरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण, पोनि/सुशांत वराळे व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख API शितलकुमार गायकवाड, आप्पासाहेब पवार, सचिन हार, अजय परदेशी, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर मिसे, गणेश शिर्के, संतोष जाधव, राजू पवार, समाधान मारकड, अमृत सुरवसे, राहुल चव्हाण, उमेश कोर्सेगांव, श्रीरंग काशिद यांनी पार पाडली.


