Nation

फुकट मिळणाऱ्या भांड्यासाठी मजुरांकडून उकळले पैसे

दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात

माढा, दि. ६ ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असतात, याचा अनेक मजूर लाभ घेऊन आपले काम करताना दिसतात, या ना त्या कारणांवरून हे विभाग कायम चर्चेत असते , याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापासून ते ग्रामीण भागातील खासगी एजेंटाकडून मोठ्या प्रमाणात कामगारांकडून पैशाची लूट होत असते , मध्यंतरीच्या काळात शिष्यवृत्तीमधील प्रकरणात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर मोठी कार्यवाही झाली होती , असे असतानाही भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तर खूपच मोठ्या रकमेची तडजोडी कराव्या लागतात अशी कुजबूज ऐकायला मिळत आहे.   

याबाबत सविस्तर माहिती अशी की – आरोपी खाजगी इसम क्र. १) श्री. विनोद विजय गाडेकर, वय ३७ वर्षे, पद- ऑपरेटर भांडी वाटप केंद्र, उपळाई (बु.) रा. उपळाई (बु.) ता. माढा, जि. सोलापूर २) श्री. दिनेश मनोहर वाघमारे, वय २३ वर्षे, पद- ऑपरेटर भांडी वाटप केंद्र, उपळाई (बु.) रा. माळी वस्ती, उपळाई (बु.) ता. माढा, जि. सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना मोफत देण्यात येणारे गृह उपयोगी भांडी संच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रथम १२००/- रुपये व तडजोडीअंती ५००/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम खाजगी इसम आरोपी क्र. २) दिनेश मनोहर वाघमारे यांनी आलोसे क्र.१ विनोद विजय गाडेकर यांचे सांगणेवरून स्वीकारले.

यातील तक्रारदार हे बांधकाम कामगार असून, त्यांनी कामगारांकरीता शासनाकडून मोफत मिळणाऱ्या भांडीसंच साठी दि.२७/०३/२०२६ रोजी अर्ज केला होता. सदर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना मोफत देण्यात येणारे गृह उपयोगी भांडी संच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रथम १२००/- रुपये व तडजोडीअंती ५००/- रुपये लाचेची मागणी यातील आरोपी क्र. १ हे करत असल्याची तक्रार दि.१६/०४/२०२६ रोजी तक्रारदार यांनी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी तक्रारदार दिल्यानंतर दि. १६/०४/२०२६ रोजी तक्रारीची पडताळणी दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. आरोपी क्र. १ गाडेकर यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत मोफत देण्यात येणारे भांडे संच देण्यासाठी ५००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज दि.०६/०५/२०२६ रोजी महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयातील कार्यालयामध्ये आरोपी क्र. १ गाडेकर यांनी आरोपी क्र. २ वाघमारे यांचे समक्ष तक्रारदार यांना लाचेची रक्कम आरोपी क्र. २ वाघमारे यांचेकडे देण्यास सांगितले व वाघमारे यांनी ५००/- रुपयाची लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता नमुद दोन्ही आरोपी यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यांचेविरुद्ध माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, एसीबी पुणे मो.क्र ९८२३१६७१५४, श्री. अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे. मो.क्र ९०२९०३०५३० यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर. मो.क्र. ९८२३२२५४६५, श्री. शैलेश पवार, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर, पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला, अक्षय श्रीराम सर्व नेमणुक एसीबी सोलापूर यांनी केली. लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट)हे कोणतेही शासकीय काम करून देणेसाठी कायदेशीर की व्यतरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन श्री.प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर मो.क्र.९८२३२२५४६५ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button