Nation
Trending

कंदलगावात १ लाख २८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा व मावा जप्त!

सोलापुर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई;

सोलापूर: ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक मोठी धडक कारवाई केली आहे. येथील ‘मे. समर्थ किराणा दुकान आणि जनरल स्टोअर्स’वर छापा टाकून पोलिसांनी १ लाख २८ हजार ९८६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मावा जप्त केला आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी (वय ३०) यांनी याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंदलगाव येथील रहिवासी विश्वनाथ नागप्पा कोरे (वय ४५) याच्या मालकीच्या समर्थ किराणा दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि साठा केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:३० च्या सुमारास पथकाने दुकानावर छापा टाकला. या कारवाईत विमल पानमसाला, व्ही १ तंबाखू, गोवा १०००, आरएमडी पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि तब्बल ३,६०० पुड्या मावा असा एकूण १,२८,९८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी विश्वनाथ कोरे याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) च्या कलम २२३, २७४, २७५ आणि १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मंद्रूप पोलीस ठाण्याचे ग्रेड पीएसआय पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उप-अधीक्षक गणेश शिंदे करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button