बेघर पती-पत्नीला ‘मातोश्री आश्रम’चा आधार; मानवी संवेदनशीलतेला धावून आली कांबळेंची "आशा "


धाराशिव, दि १६. ( प्रतिनिधी सूरज थोरात ) : समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याचे एक उत्तम उदाहरण धाराशिव येथे पाहायला मिळाले. गेल्या महिनाभरापासून धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बेघर दाम्पत्य मस्के या पती-पत्नीला अखेर मातोश्री आश्रम येथे सुरक्षित आधार मिळाला.
दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी समाजसेविका आशा कांबळे यांना वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरवदे यांचा फोन आला. सरकारी रुग्णालयात दाखल असलेले एक वृद्ध जोडपे बेघर असून त्यांची काळजी घेणारे कोणीही नसल्याची माहिती दिली व त्यांच्या पुनर्वसनासाठी मदतीची विनंती केली. त्यानंतर आशा कांबळे यांनी सोमवारी सायंकाळी त्या दाम्पत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याची विचारपूस केली.त्यानंतर मातोश्री आश्रमचे अध्यक्ष डॉ. गपाट यांना या गंभीर घटनेची संपूर्ण माहिती देऊन त्या दांपत्याला आपल्या आश्रमच्या आधाराची गरज असल्याचे सांगून आश्रमचे श्री गपाट यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता सदर दाम्पत्यास आश्रमात ठेवण्यास सकारात्मकता दाखवली . सायंकाळी ७ वाजता मातोश्री आश्रमच्या व्यवस्थापक श्रीमती. अनुजा पानसरे यांच्यासह आशा कांबळे यांनी धाराशिव शासकीय रुग्णालय गाठले आणि त्या वृद्ध दाम्पत्याची विचारपूस तसेच इतर चौकशी केली .
सदर दाम्पत्याचे नाव संगीता महेश मस्के व महेश मल्हारी मस्के (रा. मेसाई जवळगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असल्याचे समोर आले. त्यांना दोन मुले असून दोघे मुले लग्न झाल्यापासून आपापल्या सासरवाडीत घरजावई म्हणून राहत असल्याने गेल्या दहा वर्षांपासून हे पती-पत्नी एकमेकांवरच अवलंबून होते.महिला रुग्णालयात उपचार घेत होती तर तिचा पती तिच्या सोबतच होता . सरकारी दवाखान्यात उपचार करूनही त्यांच्याकडे झालेल्या बिलाचे पैसे भरण्यासाठी नाहीत हि बाब आशा कांबळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बाब रुग्णालयाचे डीन डॉ. चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली . डॉ. चव्हाण यांनीही त्यांचे तात्काळ संपूर्ण बिल माफ करण्याचे आदेश दिले.आशा कांबळे यांनी स्वतः त्या वृद्ध पती-पत्नीला मातोश्री आश्रमात आणले आश्रमात त्यांना प्रथम पोटभर जेवण देऊन विश्रांतीसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रात्रीचे साडेदहा वाजेपर्यंत त्या तिथेच थांबून होत्या. यातूनच त्यांची समाजसेवेची धडपड दिसून आली .
या सत्कार्यासाठी रुग्णालयाचे डीन डॉ, चव्हाण, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक डॉ. नवनाथ सरवदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाकाळ, सिस्टर पूनम केसकर तसेच कर्तव्यावर असलेले सर्व कर्मचारी, अनुजा पानसरे , श्री गपाट यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आशा कांबळे यांनी सांगितले .
त्याचबरोबर आशा कांबळे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.




