मंद्रूप पोलिसांची ‘सिने-स्टाईल’ कारवाई; जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या ६ तासांत उघड!


मंद्रूप, दि. २५ एप्रिल, (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री घडलेल्या एका खळबळजनक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या ६ तासांत यश आले आहे. अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री फिर्यादी हे आपल्या आयशर टेम्पोमधून मालवाहतूक करत असताना, मलसिध्दप्पा मंदिर परिसरात तीन अज्ञात इसमांनी त्यांचा टेम्पो अडवला. आरोपींनी फिर्यादीस बेदम मारहाण करून त्यांच्याकडील ₹२०,०००/- रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि पळ काढला.
घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूपचे पोलीस निरीक्षक श्री. शंकर पटवारी यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रेस करून त्यांचा ‘सिने-स्टाईल’ पाठलाग केला. अत्यंत शिताफीने कारवाई करत पोलिसांनी ३ पैकी २ आरोपींना जेरबंद केले, तर तिसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. अटक आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची धडाकेबाज कारवाई खालील पथकाने यशस्वी केली:
मार्गदर्शक: पो.नि. शंकर पटवारी
अधिकारी: पो.उप.नि. राज डांगे
अंमलदार: सहा.फौ. बापू शिंदे, पो.कॉ. माजिद शेख, संदीप काळे, चालक श्रीशैल शिवणे.
”पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचा धडाका लावला आहे. अवघ्या ६ तासांत झालेली ही कारवाई गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारी ठरली आहे.”
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राज डांगे हे करत आहेत.



