कंदलगावात नैराश्यातून विवाहितेची आत्महत्या..


कंदलगाव, दक्षिण सोलापूर ०१ जुलै ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
कंदलगाव येथे सततच्या नैराश्यातून एका ४५ वर्षीय विवाहितेने घराच्या छतावरील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
लक्ष्मी धनुष्य ऐवळे (वय ४५) राहणार कंदलगाव (ता. दक्षिण सोलापुर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती धनुष्य चंद्राम ऐवळे राहणार कंदलगाव यांनी मंद्रुप पोलिसात खबर दिली आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, काल मंगळवारी ३० जून रोजी रात्री साडे आठ वाजता दोन्ही मुले, मुलगी व पत्नी लक्ष्मी जेवण करून घरीच बसलो होतो. त्यानंतर पत्नी लक्ष्मी ही अचानक घराच्या बाहेर गेली. बराच वेळ झाला तरी न आल्याने मुलगी प्रियंका तिला शोधण्यासाठी बाहेर गेली. नंतर घराच्या छतावर जाऊन पाहिले असता छतावरील लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकत असल्याचे दिसले. मग मुलींनी पळत खाली येऊन आम्हाला सांगितले. त्यानंतर वरती जाऊन आम्ही तिचा गळफास काढला. बेशुध्द अवस्थेत मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले. माझी पत्नी सतत निराशा राहत होती. त्याच नैराश्यातुन तिने गळफास घेवुन आत्महत्या केली. याशिवाय दुसरे काही कारण नाही. मंद्रुप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.



