Nation
Trending

इच्छुक किन्नर नगरसेवकाचा लष्कर मुर्गीनाला परिसरात खून

सोलापूर दि २८ ( प्रतिनिधी ) : शहरातील लष्कर भागातील मुर्गीनाला परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. येथे राहणाऱ्या आयुब सय्यद (वय ५०) या तृतीयपंथीचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

आयुब सय्यद हे एमआयएम पक्षाकडून प्रभाग क्रमांक १६ मधील इच्छुक नगरसेवक उमेदवार होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीची तयारी सुरू होती तसेच परिसरात त्यांचे बॅनरही लावण्यात येत होते. मात्र अचानक घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी घराचे दार उघडून पाहिले असता आयुब हे बेडवर निपचित अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडावर उशी ठेवलेली होती. उशीच्या सहाय्याने गुदमरवून त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय नातेवाइकांकडून व्यक्त केला जात आहे.

घराशेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रात्री दोन ते तीनच्या सुमारास आयुब यांच्या घरातून तिघे अज्ञात इसम बाहेर पडताना दिसून आले आहेत. संबंधित इसमांच्या हातात बॅग असल्याचे तसेच डोक्यावर टोपी व पायात पांढरे बूट असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

आयुब सय्यद यांचा मृतदेह शवेविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आयुब यांचा स्वभाव मनमिळावू असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं व रोख रक्कम असल्याने लुटीच्या उद्देशाने खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, हा खून नेमका कोणी व कशासाठी केला, याचा तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button