Nation
Trending

कॉपर वायर चोरीचा पर्दाफाश; आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल

१ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; १४५ किलो कॉपर वायर हस्तगत

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

सोलापूर, दि. १४ सप्टेंबर २०२६ ( प्रतिनिधी ) सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. सोलर प्लांट, नदीकाठ तसेच इलेक्ट्रिक पंप आणि पानबुडी मोटार परिसरातून कॉपर वायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून, एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या कारवाईत १४५ किलो वजनाची कॉपर वायर जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ८८ हजार ५०० रुपये आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकाने इलेक्ट्रिक मोटारीतील कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयी माहिती घेत असताना सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानदेव वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मौजे रानमसले, ता. उत्तर सोलापूर येथील इसम कॉपर वायर चोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला असता समाधान नवनाथ पवार (वय २१, रा. रानमसले, ता. उत्तर सोलापूर) हा संशयित आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने कॉपर वायर चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने साथीदारासह गोंडगाव, वडशिंगे, बेंबळे, रांजणी, ता. माढा आदी परिसरातून सोलर प्लांट तसेच नदीकाठच्या ठिकाणांहून कॉपर वायरची चोरी केली. चोरी केलेली वायर कापून वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून विक्री करण्यासाठी ठेवण्यात आली होती. आरोपीच्या घरातील खोलीतून चोरीच्या विक्रीसाठी ठेवलेली एकूण सहा तांब्याच्या तारांची बंडले पोलिसांनी जप्त केली.

या कारवाईत वैराग पोलीस ठाणे, माढा पोलीस ठाणे व टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी/एकूण सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उकल झालेले गुन्हे

क्र. पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक कलम

१ वैराग २४८/२०२६ बीएनएस ३०३(२)
२ माढा १२५/२०२६ बीएनएस ३०३(२)
३ माढा २११/२०२६ बीएनएस ३०३(२)
४ टेंभुर्णी ११८/२०२६ बीएनएस ३०३(२)
५ टेंभुर्णी १३९/२०२६ बीएनएस ३०३(२)
६ टेंभुर्णी २०७/२०२६ बीएनएस ३०३(२)

सदर आरोपीस वैराग पोलीस ठाणे गुन्हा क्र. २४८/२०२६, बीएनएस ३०३(२) अन्वये अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सर्फो/नारायण गोतेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ नाशीर कोनढे, मोहन मनसावले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडीबा मोरे, अक्षय डोंगरे, सतीश बुरकुल, कपिल काटकर तसेच महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button