
दोन संशयित आरोपी ताब्यात; रोख रक्कम व मोटारसायकलसह ₹२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर, दि. १६ सप्टेंबर ( प्रतिनिधी )
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जबरी चोरी, मोटारसायकल चोरी व इतर चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई सुरू होती. याचदरम्यान पोलिसांना मिळालेल्या खबरीच्या माहितीवरून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील कंपाऊंडच्या भिंतीलगत, मार्केट चौकी ते हरिभाई प्रशालाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर संशयित अवस्थेत थांबलेल्या मोटारसायकलस्वारांचा शोध घेण्यात आला.
पोलिसांनी MH-13-DF-5334 क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे (१) मल्लिनाथ राजशेखर जवळगी (वय ३६, व्यवसाय चालक, रा. सध्या घर नं. ८१६, उत्तर कसबा, शेटे वाडा, सोलापूर, मूळ रा. सोलापूर सुलेरजवळगे , ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) आणि (२) नागेश मल्लिनाथ बळते (वय १८ वर्षे २० दिवस, रा. ८१६, उत्तर कसबा, शेटे वाडा, सोलापूर ) अशी निष्पन्न झाली.
त्याच्या ताब्यातील पिशवीबाबत चौकशी केली असता, त्यांनी सोलापूर शहरातील दत्त चौक परिसरात राजेंद्र जवळच्या दुकानाजवळून पायी चालत जाणाऱ्या एका वयस्कर इसमाचा पाठलाग करून त्यांना दमदाटी केली व त्यांच्याकडील रोख ₹१,००,००० असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या कारवाईत आरोपींकडून रोख ₹१,००,०००/- तसेच सदर गुन्ह्यात वापरलेली सुमारे ₹१,००,०००/- किंमतीची MH-13-DF-5334 क्रमांकाची युनिकॉर्न मोटारसायकल, असा एकूण ₹२,००,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं. ७०८/२०२६, भारतीय न्याय संहितेतील कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे तसेच पथकातील पोलीस अंमलदार वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी यांनी केली.


