Nation
Trending

“बुद्धांच्या शांतता, अहिंसा व मानवतावादी विचारांनीच जगात सुख-शांती नांदेल” — बौद्धाचार्य अण्णासाहेब वाघमारे

शाक्य संस्थेच्या चवथ्या वर्धापन दिनाला सामाजिक एकतेचा जागर”

सोलापूर , दिनांक 8, ( प्रतिनिधी : शांताराम वाघमारे )  सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूरचा चवथा वर्धापन दिन धनश्री मल्टिपर्पज हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतानाच सामाजिक एकोपा, शांतता आणि मानवतावादी विचारांची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

बुद्ध-आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार; सामूहिक बुद्धवंदनेने सुरुवात

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे बौद्धाचार्य अण्णासाहेब वाघमारे, बौद्धाचार्य अशोक वाघमारे, साप्ताहिक जनसंवादाच्या पाऊलखुणाचे संपादक संगप्पा कांबळे व शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.

शासन दरबारी २९ निवेदने सादर करून पाठपुरावा

संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंगध मुके यांनी प्रास्ताविकातून संस्थेची स्थापना, ध्येय-धोरणे आणि सामाजिक कार्याची माहिती दिली. विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संस्थेने आतापर्यंत शासन दरबारी २९ निवेदने सादर केली असल्याचे त्यांनी सांगितले.

युद्धजन्य परिस्थितीवर चिंता

बौद्धाचार्य अण्णासाहेब वाघमारे व बौद्धाचार्य अशोक वाघमारे यांनी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. युद्धामुळे जग विनाशाच्या दिशेने जात असून त्याचा परिणाम महागाई व टंचाईच्या स्वरूपात सर्वसामान्यांवर होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी जगाने तथागत गौतम बुद्धांच्या शांतता, अहिंसा व मानवतावादी विचारांचा स्वीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना आवाहन

संस्थेचे सभासद शिवपुत्र घटकांबळे यांनी आगामी भीमा-कोरेगाव संग्राम व चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. भारतीय बौद्ध महासभेने या ऐतिहासिक कार्यक्रमांसाठी तयारी सुरू केली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेच्या यशासाठी एकोपा महत्त्वाचा

संस्थेचे सल्लागार व सेवानिवृत्त DySP बाळासाहेब सरवदे यांनी संस्थेचे कार्य यशस्वी होण्यासाठी सभासदांमध्ये एकोपा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. शाक्य संस्थेच्या सदस्यांनी आजपर्यंत दाखवलेले एकीचे बळ भविष्यातही कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सुंदर सूत्रसंचालन; प्रीतिभोजनाने समारोप

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आनंद मसलखांब यांनी केले. उपस्थित प्रमुख पाहुणे, मान्यवर व नागरिकांचे आभार शेखर वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांसाठी प्रीतिभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमास शेखर वाघमारे, शिवपुत्र घटकांबळे, शांताराम वाघमारे, डॉ. अंगध मुके, परमेश्वर जानराव, नागेश गायकवाड, गोपी कांबळे, व्यंकटेश सोनवणे, आबादास बनसोडे, श्रीमंत गायकवाड, कैलास गायकवाड, मिलिंद कोरे, संभाजी शिंदे, वामन सुरवसे, ईश्वर मसलखांब, नाना गाडे, सुधाकर सुरवसे, किसन सुरवसे, अशोक सोनवणे, आनंद काळोखे, बाळासाहेब सरवदे, सुनील पायाळे, अशोक दिलपाक, शशिकांत बाबरे, महादेव माने, अण्णाराव गायकवाड तसेच लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. सिद्धार्थ तळभंडारे यांच्यासह संस्थेचे सभासद सहकुटुंब उपस्थित होते.

वर्धापन दिनाच्याकार्यक्रमातील ठळक मुद्दे –

▪ शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा चवथा वर्धापन दिन

▪ शासन दरबारी आतापर्यंत २९ निवेदने सादर करून पाठपुरावा

▪ बुद्धांच्या शांतता व अहिंसेच्या विचारांचा स्वीकार करण्याचे आवाहन

▪ ऐतिहासिक कार्यक्रमांसाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

▪ संस्थेच्या कार्यासाठी सभासदांचा एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button