१.२० लाखांच्या लाचेप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी अटकेत
भ्रष्टाचाराविरोधात एसीबीचा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे दणका

ब्रेकिंग न्यूज :-
अक्कलकोट,दि १६ जून, द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क : स्कॉर्पिओ कार व मोबाईल परत मिळवून तसेच वडील आणि चुलत्याला जमीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात १ लाख ४० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अक्कलकोट येथे धडक कारवाई करत पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
एसीबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजेश्वर रामचंद्र कोळी (वय ५७), पोलीस हवालदार, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे (वय ६१) आणि श्री. आकाश शरण्णाप्पा काडरामे (खाजगी इसम वय ३३) अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदाराच्या मित्राने फिरण्यासाठी घेतलेली स्कॉर्पिओ कार आणि मोबाईल चार दिवसांपासून परत न केल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात तक्रारदाराच्या नातेवाईकांशी संपर्क साधून आरोपींनी संबंधित गुन्ह्यात नाव टाकणार नाही तसेच स्कॉर्पिओ कार व मोबाईल परत मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
यासाठी आरोपींनी सुरुवातीला १ लाख ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. तडजोडीनंतर १ लाख २० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र लंभाते व पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.



