“ग्रामीण भागातील मुलींनी अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे” – Psi राजकुमार डांगे

मंद्रूपमध्ये १० वी, १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न

मंद्रूप दि १५ मे , (प्रतिनिधी राहुल उडाणशिव ) :
डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप आणि अक्षर ज्युनिअर कॉलेज, कंदलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन मेळावा मातोश्री सभागृह, मंद्रूप येथे उत्साहात पार पडला.
मंद्रूप पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील मुलींनी MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे, असे सांगितले. शिक्षण हेच प्रगतीचे सर्वात मोठे साधन असून मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मंद्रूप परिसरात तीन बालविवाह रोखल्याची माहिती देत पालकांनी मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे मळसिद्ध मुगळे यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि वैचारिक श्रीमंतीच्या जोरावर यश मिळवावे, असे सांगितले. “माणूस पैशाने गरीब असला तरी चालेल; पण विचारांनी श्रीमंत असणे आवश्यक आहे. मनातील वैचारिक दारिद्र्य संपल्याशिवाय खरी प्रगती होणार नाही,” असे ते म्हणाले. भगवद्गीतेतील कर्मयोगाचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांनी फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने परिश्रम करत राहावे, असे आवाहन केले. तंत्रज्ञानाच्या युगात कॉपीसारख्या प्रकारांना वाव नसून, केवळ प्रामाणिक मेहनतीनेच यश मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य अशोक कोळेकर यांनी अक्षर ज्युनिअर कॉलेजचा २०१३ ते २०२६ पर्यंत बारावीचा सलग १०० टक्के निकाल कायम असल्याचे सांगितले. तसेच CET, NEET, JEE क्लासेस, पोलीस भरती प्रशिक्षण, NCC व Hostel सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाला सरपंच अनिताताई कोरे, मंद्रूप पोलीस स्टेशनचे राजकुमार डांगे, पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, संचालक अभिजीत जवळकोटे, उपसंचालक अविनाश जवळकोटे, तपस्वी कॉम्प्युटर निंबर्गीचे आदित्य जवळकोटे, अक्षर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोक कोळेकर, प्रा. नीता वाघचवरे, प्रा. बाबासाहेब कोकरे, प्रा. महासिद्ध वाले, प्रा. महेश रेवातगांवकर यांच्यासह मंद्रूप, भंडारकवठे, औराद, टाकली, निंबर्गी, विंचूर, सादेपूर, बसवनगर, कंदलगाव, वांगी परिसरातील विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच डी. एस. कमळे गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंद्रूप येथे MS-CIT चे प्रशिक्षण घेणारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत जवळकोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नीता वाघचवरे यांनी केले तर आभार प्राचार्य अशोक कोळेकर यांनी मानले



