Nation
Trending

श्रेया नीलकंठ जाधवरला होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रौप्य पदक

​सोलापूर :- दि. १४ ( द लोकतंत्र नेशन नेटवर्क ) ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६’ चा निकाल जाहीर झाला असून, सोलापूरच्या दमाणी विद्या मंदिरमधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. श्रेया नीलकंठ जाधवर हिने रौप्य पदक (Silver Medal) पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

​विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील तर्कशुद्ध विचारांना चालना मिळावी, यासाठी ही स्पर्धा तीन कठीण टप्प्यांत घेतली जाते.

१. लेखी परीक्षा: पहिल्या फेरीत विज्ञानातील मूलभूत ज्ञानावर आधारित परीक्षा.

२. प्रात्यक्षिक परीक्षा: दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांच्या प्रयोग कौशल्याची चाचणी.

३. प्रकल्प व मुलाखत: अंतिम टप्प्यात ‘Action Research Project’ चे सादरीकरण आणि तज्ज्ञांकडून मुलाखत घेतली जाते.

​संशोधनाचा विषय: अक्षय ऊर्जा (Renewable Energy)

​श्रेयाने या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी ‘Efficacy of Renewable Energy Sources’ या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. या प्रकल्पासाठी तिने सोलापूर जिल्ह्यातील ‘जकराया शुगर्स’ येथील उसाच्या चिपाडापासून (टाकाऊ पदार्थ) होणारी इथेनॉल गॅस निर्मिती आणि सोलापूर महानगरपालिकेच्या ‘अंकित भोगाव’ येथील कचरा डेपोमधील गॅस निर्मिती प्रकल्पाला प्रत्यक्ष भेटी दिल्या होत्या. तेथील प्रक्रिया आणि येणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करून तिने मांडलेल्या सविस्तर प्रबंधाची दखल घेत तिची रौप्य पदकासाठी निवड करण्यात आली.

​या यशाबद्दल श्रेयाला पदक, ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. श्रेयाला दमाणी विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. पैंबर्ती, विज्ञान शिक्षिका सौ. शेळके आणि सौ. सुमन कटारे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button