मंद्रुपच्या स्वराली व स्वानंदी काळे या बहिणींची इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


मंद्रुप : दक्षिण सोलापूर, दि १२ ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
मंद्रुप येथील स्वराली व स्वानंदी काळे या दोन बहिणींची इंडोनेशिया येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चौथी व पाचवी मध्ये शिकणाऱ्या या चिमुकल्या मुलींच्या यशाचे कौतुक होत आहे.
गोवा येथे नुकतेच गोवा स्केटिंग फेस्टिव्हलमध्ये इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये स्वराली काळे व स्वानंदी काळे या चिमुकल्या सख्या बहिणींनी भाग घेतला होता. यामध्ये स्वराली हिने २ सिल्व्हर तर स्वानंदी हिने १ गोल्ड व १ ब्रान्ज पदक पटकावले. आहे. त्यामुळे या दोघींची बाली (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोघी बहिणी सोरेगाव येथील सुयश सेंट्रल स्कुलमध्ये शिकतात. स्वराली पाचवीत तर स्वानंदी चौथी वर्गात शिकत आहे. या दोघी बहिणी मंद्रूपच्या असून आई सुजाता व्हनकडे या विंचूरला ग्रामसेविका आहेत. दोघीही विजर्स फांऊडेशन सोलापुर येथे स्केटिंगचे प्रशिक्षण घेतात. त्यांना प्रशिक्षक सम्यक मोहोळकर व सागर राठोड यांनी मार्गदर्शन केले. इंडोनेशियात होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल या दोघी बहिणींचे कौतुक होत आहे.




