सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी


सोलापूर दि. ८, (प्रतिनिधी शांताराम वाघमारे)
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांच्या वतीने आदर, त्याग व संघर्षाचे प्रतीक असलेल्या माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती सारनाथ बुद्ध विहार, फॉरेस्ट परिसर, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध विहाराचे संयोजक विश्वास नागटिळक यांनी बुद्ध वंदना घेऊन केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा मांडत माता रमाईंची जयंती साजरी करण्यामागील सामाजिक व वैचारिक महत्त्व स्पष्ट केले. तसेच सारनाथ बुद्ध विहारामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख वक्ते व संस्थेचे अध्यक्ष अंगद मुके यांनी माता रमाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत संसार करताना त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, त्याग व संघर्ष यांचे सविस्तर वर्णन केले. माता रमाईंचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडून सांगताना त्यांनी त्यांच्या त्यागमय जीवनाला मानवंदना दिली. तसेच फॉरेस्ट परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव सरवदे यांनी माणसाचे मन खूप चंचल असते, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनावर ताबा मिळवणे गरजेचे आहे, त्यासाठी आपणास तथाकत भगवान बुद्धाचे चरित्र मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन केले.
गेल्या रविवारी सारनाथ बुद्ध विहाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लहान मुला-मुलींच्या हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धेचे निकाल यावेळी जाहीर करण्यात आले. स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष अंगद मुके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी बुद्ध विहाराचे प्रबंधक विश्वास नागटिळक यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमास शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे शिवपुत्र घटकांबळे, नाना गाडे, शांताराम वाघमारे, अंबादास बनसोडे, अशोक सोनवणे, श्रीमंत गायकवाड, अंगद मुके, आनंद काळोखे, व्यंकटेश सोनवणे, मिलिंद कोरे, गोपी कांबळे, शेखर वाघमारे, राजू ओहळ यांच्यासह फॉरेस्ट परिसरातील अनेक आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी शाक्य संस्था सोलापूरचे वतीने छापण्यात आलेल्या दिनदर्शिकीचे उपस्थितांना वाटप करण्यात आले



