

सोलापूर दि ८ (प्रतिनिधी).
शनिवार दिनांक 07.02.2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक 2026 ची निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे.त्या अनुषंगाने उद्या दिनांक 09.02.2026 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार असल्याने निकालाच्या कालावधीत संभाव्य विजय / उत्सव, प्रतिस्पर्धी गटातील कार्यकर्ते यांचेकडुन तणाव होऊन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या करीता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडुन सोलापूर ग्रामीण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता कडक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. मतदानानंतर कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी अग्रिम गुप्त माहिती संकलन सुरू असून आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. विजयी उमेदवार यांची मिरवणुक रॅली किंवा जाहीर सभांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.निवडणुकी मध्ये विजयी व पराभुत उमेदवारांचे समर्थक समोरा समोर येणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत असून मतमोजणी केंद्रावर कठोर बॅरिकेडिंग, पुरेसा पोलीस बंदोबस्त व आवश्यक सुरक्षा साहित्य तैनात करण्यात आले आहेत.
सर्व पोलीस वाहनांवरील ध्वनीवर्धक ( P.A.सिस्टम ) सातत्याने कार्यरत ठेवण्यात येत असून जमाव नियंत्रणासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. डी.जे. प्रेशर हॉर्न, मॉडिफाइड सायलेन्सर किंवा अत्याधिक आवाज निर्माण करणा-या वाहनांवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. विजयी उमेदवारांना डी.जे ध्वनीवर्धक किंवा मिरवणुकींचा वापर न करण्याबाबत स्पष्ट इशारा देण्यात आला असून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात येत आहेत.संवेदनशील ठिकाणे व प्रमुख चौकावर पोलीस पिकेटस उभारण्यात आले आहेत. क्षेत्रनिहाय व झोन निहाय सतत पेट्रोलिंग सुरू असून वरिष्ठ अधिकारी स्वत: संवेदनशील भागात गस्त घालत आहेत.स्थानिक बातमीदार, गावस्तरीय माहिती यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून सोशल मिडिया (व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी ) वर लक्ष ठेऊन अफवा व चिथावणीखोर संदेशावर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. राज्य राखीव पोलीस दल, स्ट्राईक फोर्स व उपलब्ध सर्व साधनसामग्री संवेदनशील ठिकाणी सज्ज ठेवण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क व महसुल विभागांशी समन्वय ठेऊन संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.
मतमोजणी नंतर निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीस परवानगी दिली जाणार नाही. याबाबत संबंधीत उमेदवार यांचे मध्ये कायदेशीर जनजागृती करण्यात येत आहे. मतदान अथवा निकाला संदर्भात जमलेला कोणताही जमाव तात्काळ पी.ए. सिस्टमव्दारे विखुरला जाईल . श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी याव्दारे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित रखणे करीता पोलीसांना सहकार्य करावे, कोणत्याही परिस्थितीत कायदा भंग करणा-यावर कठोर योग्य ती उचित कायदेशीर कारवाई करणे करीता सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन संपुर्णत: सज्ज असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देणे करीता तत्पर असल्याचे सांगितले आहे.



