तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी–वंचित बहुजन आघाडीची संयुक्त शक्तीप्रदर्शन व प्रचार सभा


तुळजापूर दि २७. ( प्रतिनिधी सूरज थोरात ): नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने तुळजापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला.
या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या नेते सुजात आंबेडकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुलदीप भैय्या पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या शामलताई वडणे, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे, तसेच डॉ. ढेपे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवारही मंचावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात नेते सुजात आंबेडकर यांनी तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. “सामाजिक न्याय, नागरिकांसाठी समतोल सुविधा आणि प्रामाणिक विकास हा आमचा मुख्य ध्येयविचार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुलदीप भैय्या पाटील यांनी तुळजापूरच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सक्षम व जवाबदार नेतृत्व महाविकास आघाडीच देऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेच्या शामलताई वडणे यांनी महिलांच्या प्रगतीसाठी ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.
वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे आणि डॉ. ढेपे यांनी सामाजिक बांधिलकी, विकास आणि पारदर्शक कारभारासाठी आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.
“तुळजापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडीलाच मत द्या,” असे सर्व वक्त्यांनी एकमुखाने आवाहन केले. सभेने तुळजापूरातील निवडणूक वातावरण अधिक तापवले असून परिसरात या सभेची व्यापक चर्चा होत आहे.






