
१ कोटी ५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अक्कलकोट, ( प्रतिनिधी) अक्कलकोट दक्षिण पोलिसांची धडक कारवाई; २४० गांजाची झाडे जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल.अक्कलकोट प्रतिनिधी – अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत मौजे आळगी, ता. अक्कलकोट येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतातून तब्बल १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत एकूण २४० गांजाची झाडे आढळून आली असून, त्यापैकी २१० झाडे जिवंत तर ३० झाडे वाळलेली होती. जप्त मुद्देमालाचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती.२८ सप्टेंबर २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व त्यांचे पथक करजगी दुरक्षेत्र परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आळगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथील एका शेतकऱ्याने ऊसाच्या पिकामध्ये गांजासदृश वनस्पतीची लागवड केली आहे.मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, अक्कलकोट विभाग यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित शेतात जाऊन पाहणी केली.यावेळी मलप्पा गुरुबाळप्पा गड्डी उर्फ बिराजदार (वय ६०, रा. शेगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्या ऊसाच्या शेतात ठिकठिकाणी अंदाजे १२ फूट उंचीची गांजासदृश झाडे लागवड केलेली आढळून आली. पंचनाम्याअंतर्गत ही झाडे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या २४० झाडांमध्ये २१० जिवंत व ३० वाळलेल्या झाडांचा समावेश आहे. त्यांचे एकूण वजन २११ किलो १०० ग्रॅम असून, त्याची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ अन्वये अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे यांच्यासह अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होते.



