Nation
Trending

डॉ. कोटणीस फाउंडेशनच्या वतीने दोन महिने विविध उपक्रम

मोफत आरोग्य शिबिरे, मानस मित्र संवादाचे आयोजन

सोलापूर ( प्रतिनिधी ) सोलापूरात डाॅ. द्वारकानाथ कोटणीस फाउंडेशन या सार्वजनिक ट्रस्टची स्थापना झाली असून ही संस्था व रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ. कोटणीसांचा जन्मदिन (10 ऑक्टोबर) ते स्मृतीदिन (9 डिसेंबर) या दोन महिन्यात संस्था गरीबांसाठी विविध प्रकारची मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणार आहे. त्याचप्रमाणे समाजामधील विशेषतः तरुणांमधील वाढत असलेली निराशा व त्यातून घडणार्‍या आत्महत्या रोखण्यासाठी मानसमित्र संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.बुधवार दि. 21 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 ते 2 पर्यंत मोफत मोतिबिंदू तपासणी शिबिर देसाई आय हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. नंतर मोतीबिंदुंच्या रुग्णांची मोफत ऑपरेशनस् ही करण्यात येणार आहेत. विविध गरीब वस्त्यांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, त्यादृष्टीने मोफत कॅन्सर निदान शिबिरे आयोजिण्यात येणार आहेत. समाजामध्ये विशेषतः तरुणांमध्ये अलीकडे निराशा व त्यातून आत्महत्या वाढत चाललेल्या दिसत आहेत. त्यावर उपाय म्हणजे तरुणांशी संवाद साधून मानसिक तणाव कमी करणे होय. म्हणजेच मानसमित्र ही संकल्पना संस्था मोठ्या प्रमाणात राबविणार आहे. यासाठी तरुणांची चर्चासत्रे संस्था संघटित करणार आहे. डाॅ. कोटणीसांच्या मानवतावादी कार्यावर परिवर्तन अकादमीने तयार केलेला माहितीपट शहरातील सर्व वैद्यकीय व नर्सिंग काॅलेजेसमध्ये दाखविण्यात येणार आहे. बुधवार दि. 9 डिसेंबर 2026 रोजी सोलापूरातील वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टर्स, विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमात सामील होण्यासाठी आय. एम. ए. आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव असोसिएशन यांना आवाहन करणार आहोत. संस्थेने आयोजिलेल्या सर्व आरोग्य शिबिरांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन रवींद्र मोकाशी, डाॅ. सचिन जम्मा, डाॅ. सुरेश व डाॅ. नयना व्यवहारे, दादा चांदणे, रजनीकांत इंगळे, डाॅ. अतिश बोराडे व एड. सरिता मोकाशी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button