Nation

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता

२४ मे चित्र व ग्रंथ प्रदर्शन, एकपात्री नाट्यप्रयोग, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा, काव्य मैफिल, शोभायात्रा, ‘महाराष्ट्राची लोकधारा’, गजीनृत्याबरोबरच विशेष व्याख्यान , दि. २५ ते ३१ मे दरम्यान भरगच्च कार्यक्रम !

सोलापूर, दि. २४ ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त दि. २५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली. सप्ताहभर विद्यापीठ परिसरात तसेच सोलापूर शहरात चित्र व ग्रंथ प्रदर्शन, एकपात्री नाट्यप्रयोग, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, एनसीसी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, काव्यमैफिल, शोभायात्रा आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ यासह विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांचा शुभारंभ सोमवार, २५ मे रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठात होणार असून ग्रंथ व चित्र प्रदर्शनाचे लोकार्पण आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे असणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक, आध्यात्मिक व प्रशासकीय कार्याचा परिचय करून देणारे दुर्मिळ दस्तऐवज, ऐतिहासिक छायाचित्रे आणि ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

मंगळवारी, २६ मे रोजी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात ‘मी अहिल्यादेवी होळकर’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे सादरीकरण सातारा येथील प्रा. कविता म्हेत्रे करणार असून यावेळी माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर उपस्थित राहणार आहेत. बुधवार, २७ मे रोजी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून राज्यसभेचे माजी सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. गुरुवार, २८ मे रोजी सकाळी ११ वाजता एनसीसी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

शुक्रवार, २९ मे रोजी दुपारी चार वाजता मुंबईचे ज्येष्ठ कवी प्रशांत मोरे यांच्या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले असून राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते प्रमुख उपस्थिती लाभतील. शनिवार, ३० मे रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील नॉर्थकोट प्रशालेपासून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन होईल. या शोभायात्रेस महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मनपा सभागृह नेता नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक अमोल शिंदे व चेतन नरोटे उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या सभागृहात मुंबईचे प्रा. योगेश चिकटगावकर यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम रंगणार असून राज्यसभेच्या नूतन खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल.

रविवार, ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सकाळी नऊ वाजता गजीनृत्याचे सादरीकरण होईल. सकाळी अकरा वाजता मुख्य कार्यक्रम व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, पद्मश्री विकास महात्मे आणि सांगलीचे ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे असणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सप्ताहभराच्या या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थी, नागरिक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button