Nation
Trending

पत्रकारिता विद्यार्थ्यांनी घेतली विविध माध्यम संस्थांची क्षेत्रभेट

प्रत्यक्ष अनुभवली वृत्तसंकलनाची इनसाईड स्टोरी; 75 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी

सोलापूर ( प्रतिनिधी ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच सोलापूर शहरातील विविध प्रतिष्ठित माध्यम संस्था, शासकीय माहिती कार्यालय आणि श्रमिक पत्रकार संघ यांना अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट दिली. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष पत्रकारितेचे वास्तव, वृत्तसंकलनातील आव्हाने, डिजिटल युगातील बदलत जाणारे माध्यम स्वरूप आणि पत्रकारांच्या सामाजिक जबाबदार्‍या जवळून अनुभविण्याची संधी या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाली. सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि जनसंज्ञापन विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या यशस्वी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात एम.ए. जनसंज्ञापन आणि बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन या दोन्ही अभ्यासक्रमांचे मिळून एकूण 75 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना बातमी कशी शोधली जाते, ती कशी संकलित केली जाते, तिचे संपादन कसे होते आणि वृत्तसंस्थेच्या तांत्रिक व संपादकीय अडचणींवर मात कशी केली जाते, हे प्रत्यक्ष पाहाता यावे, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता. विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला होता. विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटीची सुरुवात सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथून झाली. पत्रकारिता करताना पत्रकारांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांच्या हक्कांचे रक्षण कसे होते आणि व्यावसायिक सुरक्षितता कशी जपली जाते, यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि खजिनदार किरण बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शासकीय पातळीवर पत्रकारांशी समन्वय साधणारे सर्वात महत्त्वाचे केंद्र म्हणजे ‘जिल्हा माहिती कार्यालय’. विद्यार्थ्यांनी या कार्यालयाला भेट देऊन शासकीय प्रसिद्धी यंत्रणेचे कामकाज कसे चालते, याची सखोल माहिती घेतली. जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महाविभागाची संपूर्ण रचना, धोरणे आणि जबाबदार्‍या स्पष्ट केल्या. सोनटक्के यांनी सांगितले की, शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम माहिती कार्यालय करते. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून शासनाचे निर्णय जनतेपर्यंत कसे पोहचवले जातात, प्रेस नोट कशी तयार केली जाते आणि संकटकाळात शासकीय भूमिका कशी असते, याचे धडे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. सरकारी पातळीवरील जनसंपर्क कसा हाताळला जातो, याची व्यावहारिक जोड विद्यार्थ्यांना येथे मिळाली. पत्रकारितेला केवळ राजकारण आणि गुन्हेगारी क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक घडामोडींचे वृत्तांकण कसे करावे, हे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोलापूरच्या आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला भेट दिली. तसेच दैनिक सकाळ मध्ये संपादक संभाजी पाटील आणि कार्यकारी संपादक सिध्दाराम पाटील, दैनिक तरुण भारत संपादत प्रशांत माने आणि इन सोलापूर न्यूज संपादक समाधान वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागातील एम.ए. जनसंज्ञापन आणि बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशनच्या 75 विद्यार्थ्यांनी या संपूर्ण क्षेत्रभेटीत अत्यंत शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी पत्रकारांना आणि अधिकार्‍यांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. या संपूर्ण क्षेत्रभेटीचे यशस्वी नियोजन जनसंज्ञापन विभागातील प्रा. डॉ. अंबादास भासके, प्रा. डॉ. तेजस्विनी कांबळे, प्रा. विठ्ठल एडके, प्रा. डॉ. मधुकर जक्कन आणि प्रा. ऋषिकेश मंडलिक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button