Nation
Trending

राऊंड टेबल जीवन ज्योत प्रशालेत आठ नव्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचा पुढाकार, शिक्षणाच्या वाटेला नवे बळ;

कंदलगाव : प्रतिनिधी – ( राहुल उडाणशिव )

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील राउंड टेबल जीवन ज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी आठ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. १५० राउंड टेबल या संस्थेच्या माध्यमातून या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

या आठ वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी एकूण ८० लाख रुपयांचे अंदाजित बजेट असून, त्यापैकी ४५ टक्के रक्कम सोलापूर जिल्हा संचालक मंडळ सोलापूर संस्थेकडून, तर उर्वरित ३५ टक्के रक्कम राउंड टेबल १५० संस्थेकडून बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या राउंड टेबल इंडियाच्या ‘फ्रीडम थ्रू एज्युकेशन’ उपक्रमांतर्गत देशभरातील गरजू शाळांमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारल्या जातात. वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, संगणक व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या कार्याचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच सामाजिक बांधिलकीतून कंदलगाव येथील जीवन ज्योत प्रशालेलाही वर्गखोल्यांची सुविधा उपलब्ध होत आहे.

यापूर्वीही १५० राउंड टेबल संस्थेच्या माध्यमातून जीवन ज्योत प्रशालेस चार वर्गखोल्या बांधून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा आठ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी संस्थेने पुढाकार घेतल्याने शाळेच्या शैक्षणिक सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.

यावेळी मनोगत व्यक्त करताना राउंड टेबल १५० च्या माधुरी नंदकिशोर मुंदडा यांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. “मुले ही देवाघरची फुले असून ती देशाचे उद्याचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राउंड टेबल संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे म्हटले आहे

राउंड टेबलचे गुरुदीप दोडमणी यांनी सांगितले की, राउंड टेबल संस्थेच्या माध्यमातून देशभरात आतापर्यंत सुमारे आठ हजार वर्गखोल्या उभारण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी संस्थेचे विविध उपक्रम सुरू आहेत.

जीवन ज्योत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी. एम. कमळे यांनी राउंड टेबल संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच पुढील आठवड्यात कंदलगावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमात रुग्णांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष पी. एल. कोळी, जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई कडते, सरपंच शारदाबाई पंडित कडते, राउंड टेबलचे चेअरमन अभय सुराणा, माधुरी नंदकिशोर मुंदडा, जयेशभाई पटेल, माजी चेअरमन वासुदेव बंग, चेअरमन गुरुदीप दोडमणी, संस्थेचे सचिव एम. डी. कमळे, नागेश बिराजदार, सोलापूर जिल्हा संचालक मंडळाच्या विश्वस्त रचना सुंगार, कमलताई कमळे, माजी प्राचार्य पी. एम. कमळे, ज्येष्ठ नेते आनंदराव कोले, उपसरपंच अमित नरुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजय कोले, प्राचार्य आर. बी. येलगोंडे, पर्यवेक्षक एस. बी. जमादार, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, आण्णाराव वाघमारे, माजी सरपंच शरीफ शेख, महादेव व्हनमाने यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंदे यांनी केले, तर आभार डी. एन. कांबळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button