

मोहोळ दि.१८ मार्च. [प्रतिनिधी सचिन गवळी] : आजचा ग्राहक जागरूक असणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांची जाणीव ठेवून फसवणूक, चुकीचे व्यवहार याविरोधात आवाज उठवला पाहिजे. प्रशासन देखील ग्राहकांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आसल्याचे प्रतिपादन मोहोळ तहसील कार्यालय पुरवठा निरीक्षण अधिकारी सोनाली गवळी – निटुरे यांनी केले.
मोहोळ तहसील कार्यालय व तहसील कार्यालय पुरवठा शाखा कार्यालय मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ तहसीलदार सचिन मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा शाखा कार्यालय मोहोळ येथे करण्यात आले होते त्या प्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य राजन घाडगे, दत्तात्रय कुलकर्णी, ग्राहक पंचायतीच्या यशोदा कांबळे यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथींच्या मनोगतात दत्तात्रय कुलकर्णी यांनी नमूद केले की, “ग्राहक संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. जागरूक ग्राहक हा सक्षम समाजाचा पाया आहे.”
तर राजन घाडगे यांनी ग्राहक चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत जनतेने एकत्रित येऊन अन्यायाविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास शेतकरी, बचत गटांचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अमोल कुंभार, सुरज पाटील व गौतम गाडे यांनी केले. सूत्रसंचालन राजन घाडगे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन पाटील यांनी मांडले. संपूर्ण कार्यक्रमात ग्राहक जागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला असून उपस्थितांनी याचे स्वागत केले.



