

सोलापूर, दि २ सप्टेंबर, ( प्रतिनिधी )
वरळेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथील २००९ सालच्या खून प्रकरणात दोन आरोपींना मा. विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांनी दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. लक्ष्मण जगन्नाथ हाके आणि जगन्नाथ विठ्ठल हाके अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दिनांक ४ एप्रिल २००९ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वरळेगाव येथे पूर्वी बैलपोळा मिरवणुकीदरम्यान झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी लक्ष्मण हाके व जगन्नाथ हाके यांनी राजू सिद्राम माने यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांची पत्नी अंजना राजू माने यांनी पतीला मारू नका, असे सांगितले असता आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपी लक्ष्मण हाके याने राजू माने यांच्या डोक्यात तलवारीने जबर मारहाण केली, तर जगन्नाथ हाके याने काठीने मारहाण केली. या मारहाणीत राजू सिद्राम माने यांचा मृत्यू झाला. पतीला वाचविण्यासाठी गेलेल्या अंजना माने यांनाही आरोपी नागनाथ हाके याने कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी अंजना राजू माने यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२००९ दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०७, १४७, ३२३, ५०४, ५०६, आर्म्स ॲक्ट, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच नागरी हक्क संरक्षण कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली होती.
पी.आर. पाटील यांनी केला तपास
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रद्युम्न राजाराम पाटील (पी.आर. पाटील), उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग यांनी केला. तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
तब्बल १७ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल १ सप्टेंबर २०२६ रोजी मा. मोहिते साहेब, विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांच्या न्यायालयात सुनावण्यात आला.
न्यायालयाने आरोपी (१) लक्ष्मण जगन्नाथ हाके आणि (२) जगन्नाथ विठ्ठल हाके, दोघे रा. वरळेगाव, ता. दक्षिण सोलापूर यांना भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच कलम ५०६ अन्वये एक वर्ष कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये ६ महिने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
सरकारी पक्षाकडून प्रभावी बाजू
या खटल्यात सहायक सरकारी वकील म्हणून दत्ता पवार व कविता बागल यांनी कामकाज पाहिले. आरोपींच्या वतीने नागराज शिंदे व विक्रांत फताटे यांनी कामकाज पाहिले.
दोषसिद्धीसाठी सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग तसेच कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले.
न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून श्रे.पो.उपनि. विजय जाधव, श्रे.पो.उपनि. प्रिया जाधव यांनी, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार हणमंत माळी यांनी काम पाहिले.
१७ वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणात दोन आरोपींना झालेली आजीवन कारावासाची शिक्षा ही तपास यंत्रणा, सरकारी पक्षाचे प्रभावी कामकाज आणि न्यायालयीन प्रक्रियेतील सातत्याचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे.
यामधील सर्व तपास यंत्रणेचे कौतुक, परंतु प्रश्न हा निर्माण होतो की खून आणि actrocity मधील गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी इतकी वर्षे का लागतात ? , यामध्ये दोष कुणाचा न्यायालयाचा, तपास यंत्रणेचा की आणखी कोणाचा असा सवाल जनतेच्या मनात निर्माण होतो.


