पर्यावरणाच्या रक्षणासाठी माजी सैनिकांनी बांधल्या झाडांना राख्या !

रक्षाबंधन दिनी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनने केला राष्ट्ररत्नांचा सन्मान

सोलापूर दि २९ ऑगस्ट, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) : राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त सेवानिवृत्त माजी सैनिकांना राख्या बांधून त्यांचा सन्मान करण्याचा एक आगळावेगळा स्तुत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाची सुरुवात केवळ देशरक्षणापुरती मर्यादित न राहता पर्यावरणाचेही रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश देत करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन दिलवर शेख आणि उपाध्यक्ष सुभेदार जयानंद कांबळे यांच्या हस्ते झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला. उपस्थितांनीही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार केला.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रांजली मोहीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम माजी सैनिकांसोबत साजरा करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. ज्या हातांनी देशसेवेसाठी आयुष्यभर कार्य केले, त्या हातांना राखी बांधण्याचा सुवर्णयोग आज आम्हाला लाभला आहे. समाजामध्ये या वीरांचा मानसन्मान वाढविण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू.”
संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रेमचंद मेने यांनी रक्षाबंधनाचे ऐतिहासिक संदर्भ आणि उदाहरणे देत या सणाचे महत्त्व स्पष्ट केले. विश्वस्त सौ. ज्योती मेने यांनी आपल्या मनोगतात देशसेवा करताना स्वतःच्या कुटुंबापेक्षाही देशाला प्रथम स्थान देणाऱ्या सैनिकांना सलाम करत त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन दिलवर शेख यांनी मनोगत व्यक्त करताना भावनिक शब्दांत सांगितले की, “माझ्या संपूर्ण आयुष्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्हाला अशा प्रकारे कोणीही विशेष निमंत्रित करून सन्मान दिला नव्हता. राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन ही अशी पहिली संस्था आहे, जिने आम्हाला येथे बोलावून हा अनमोल मान दिला आहे.” त्यांनी संस्थेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले तसेच आपल्या सैनिकी जीवनातील विविध अनुभवही उपस्थितांसमोर कथन केले.
सुबेदार जयानंद कांबळे यांनीही राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी सुबेदार सदाशिव पाटोळे, नायक सुबेदार मल्लप्पा पवार, नायक सुबेदार शशिकांत ताटे आणि नायक सुबेदार शहाजी देडे हे मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सर्व माजी सैनिकांना राख्या बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांसाठी नाष्ट्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमातील आणखी एक विशेष उपक्रम म्हणजे “प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या रक्षणासाठी सक्षम आहे” हा संदेश देत संस्थेतील महिला सदस्यांनी एकमेकींना राख्या बांधल्या. या उपक्रमातून महिला एकता, परस्पर सन्मान आणि संरक्षणाचा सुंदर संदेश समाजाला देण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात शैलेश मोहीकर, अनिल कोकाटे आणि संगीता महिंद्रकर यांनी सुंदर गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
कार्यक्रमास माजी सैनिक तसेच फाउंडेशनचे प्रांजली मोहीकर (अध्यक्षा), प्रा. प्रेमचंद मेने (उपाध्यक्ष), विश्वस्त सौ. ज्योती मेने, शैलेश मोहीकर, वेदांत मोहीकर, अनुराधा निकम, प्रकाश शिंपी, संगीता महिंद्रकर, लालू खंडेलवाल, विजया खंडेलवाल, आनंद खरात, चंचला खरात, भीमाशंकर पाटील, तनुजा शिंपी, भारती ढोबळे, अनिल बोराडे, अर्चना कोकाटे, नमुश्री निकम तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संख्येने उपस्थित होते. देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश यांचा सुंदर संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले, तर प्रा. प्रेमचंद मेने यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


