Nation

“महावितरणच्या विद्युत खांबावरील अनाधिकृत केबल्स तातडीने हटवा”

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने केले आवाहन !.

सोलापूर – दि. 11 ऑगस्ट , (प्रतिनिधी ) बारामती परिमंडळ : महावितरणच्या विद्युत खांबांवरील अनधिकृत केबल्स तातडीने हटविण्याचे महावितरणचे आवाहन केले असून महावितरणच्या उच्चदाब व लघुदाब विद्युत वितरण वाहिन्यांच्या खांबांवर विविध केबल ऑपरेटर, इंटरनेट सेवा प्रदाते तसेच ऑप्टिकल फायबर सेवा प्रदात्यांकडून अनधिकृतपणे केबल्स व वायर्स टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या अनधिकृत केबल्समुळे विद्युत वितरण यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याबरोबरच सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

विद्युत खांबांवर अनधिकृतपणे टाकलेल्या केबल्समुळे खांबांवर अतिरिक्त भार पडू शकतो. तसेच केबल तुटणे, झुकणे किंवा खाली लोंबकळणे यामुळे पादचारी, वाहनचालक, महावितरणचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विशेषतः उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहिन्यांच्या जवळ अशा केबल्स आल्यास विद्युत अपघाताची गंभीर शक्यता निर्माण होऊ शकते.

त्यामुळे महावितरणच्या विद्युत खांबांवर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या सर्व केबल्स संबंधितांनी स्वतःच्या खर्चाने तातडीने काढून घ्याव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

तसेच यापुढे महावितरणच्या विद्युत खांबांवर, विद्युत वाहिन्यांवर, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्र किंवा अन्य कोणत्याही विद्युत पायाभूत सुविधांवर अनधिकृतपणे केबल, इंटरनेट केबल, ऑप्टिकल फायबर किंवा इतर वायर्स बांधू अथवा टाकू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

देखभाल व दुरुस्तीच्या कामात अडथळा –

महावितरणची विद्युत यंत्रणा ही अत्यावश्यक सार्वजनिक सेवा असल्याने तिची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि आपत्कालीन बिघाड निवारणाची कामे सुरक्षितपणे व तातडीने करणे आवश्यक असते. विद्युत खांबांवर अनधिकृतपणे बांधलेल्या केबल्समुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामालाही विलंब होण्याची शक्यता असते.

सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य –

अनधिकृत केबल्समुळे केवळ विद्युत यंत्रणेच्या देखभालीत अडथळा निर्माण होत नाही, तर केबल्स तुटणे किंवा लोंबकळणे यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व केबल ऑपरेटर व इंटरनेट सेवा प्रदात्यांनी महावितरणच्या विद्युत यंत्रणेची सुरक्षितता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कायदेशीर कारवाईचा इशारा –

अनधिकृत केबल्स तातडीने न काढल्यास तसेच यापुढे महावितरणच्या विद्युत पायाभूत सुविधांवर अनधिकृतपणे केबल्स किंवा वायर्स टाकल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायदे, नियम व विनियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे.

ही सूचना विद्युत अधिनियम, २००३ तसेच केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे उपाय) विनियम, २०२३ मधील विनियम क्र. १४ यांच्या अनुषंगाने देण्यात येत आहे.

नागरिकांची सुरक्षितता आणि विद्युत वितरण यंत्रणेची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी सर्व संबंधितांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button