Nation

बहिणीला कॉलेजला सोडून परतणाऱ्या भावावर काळाने घातला घाला

टिप्परला धडकल्याने गुंजेगावच्या रिहानचा जागीच मृत्यू


कंदलगाव, दक्षिण सोलापूर, दि. ७ जुलै ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )
कंदलगाव-मोहोळ महामार्गावरील गुंजेगाव फाट्याजवळ वाळू भरलेल्या टिप्पर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून मोटरसायकलवरून येणाऱ्या तरुणाची टिप्परला जोराची धडक बसली. त्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

रिहान मिनाज मुजावर (वय १९) सध्या राहणार गुजेगांव (ता. दक्षिण सोलापुर) मूळ गाव वाखरी (ता. पंढरपुर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रिहान मुजावर सोलापूर येथील आयटीआय मध्ये शिकत होता. आज सकाळी नऊ वाजता गुंजेगाव हद्दीतील शेतातील आपल्या वस्तीवरून तो बहीण हिनासह मोटरसायकलवरून (एम एच १३ इ जी ४७३४) निघाला. कंदलगाव येथील अक्षर पब्लिक स्कूलमध्ये अकरावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या बहिण हिनाला तेथे सोडले. त्यानंतर मोटारसायकलवरून आयटीआयचे प्रॅक्टिकल असल्याने कामती मार्गे सोलापूरच्या दिशेने निघाला.
गुंजेगाव फाट्यात जवळ आल्यानंतर समोरून चाललेल्या वाळूने भरलेला टिपरच्या (एम एच 13 ए एक्स ३४११) चालकाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पाठीमागून येणारा रिहान हा टिप्परवर जाऊन आदळला. धडक इतकी जोरात बसली की मोटरसायकल टिपर मध्येच अडकली. डोक्याला गंभीर मार लागल्याने रेहान जागीच कोसळला.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
या अपघात प्रकरणी वडील मिनाज मुजावर राहणार सध्या गुजेगांव यांनी मंद्रूप पोलिस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून मंद्रुप पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button