वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांस्कृतिक सभागृहाचा मुद्दा केंद्रस्थानी; खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे रंगमंच संस्थेची मागणी


मोहोळ दि. [ प्रतिनिधी सचिन गवळी] : मोहोळ शहरात नाटकाचे पडदे उघडतात… पण रंगमंचाला स्वतःचे घर नाही. संगीत घुमते… पण त्यासाठी स्वतंत्र सभागृह नाही. हीच वेदना, हीच उणीव आणि हीच जाणीव घेऊन रंगमंच संस्था, मोहोळ यांच्या वतीने रामलिंग महामुनी व राजन घाडगे यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची भेट घेतली आणि शहराच्या सांस्कृतिक भविष्याचा आराखडा त्यांच्या समोर मांडला.* मोहोळ हे केवळ शहर नाही, तर कला, साहित्य आणि लोकसंस्कृतीची परंपरा जपणारी भूमी आहे. मात्र या परंपरेला साजेसं, मध्यवर्ती ठिकाणी उभारलेलं सुसज्ज सांस्कृतिक सभागृह आजही केवळ कागदावरच अस्तित्वात आहे. नाट्यप्रयोग, सांस्कृतिक महोत्सव, शालेय कार्यक्रम, विचार मंथन सगळं काही तात्पुरत्या, अपुऱ्या जागांवर पार पाडावं लागत असल्याची वस्तुस्थिती निवेदनातून ठळकपणे मांडण्यात आली. ही बाब ऐकून घेताना खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केवळ औपचारिक प्रतिसाद न देता, “हा प्रश्न केवळ इमारतीचा नसून मोहोळच्या सांस्कृतिक अस्मितेचा आहे” असे सूचक वक्तव्य करत विषयाला सकारात्मक दृष्टीने पुढे नेण्याचे संकेत दिले. दीर्घकाळ रखडलेला हा मुद्दा आता प्राधान्याने हाताळला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर मोहोळ शहरात आधुनिक सुविधा असलेले सांस्कृतिक सभागृह उभे राहिले, तर ते केवळ भिंती आणि छप्पर नसेल; ते कलाकारांचे स्वप्न, विद्यार्थ्यांची संधी आणि शहराची ओळख बनेल. नवोदित कलाकारांना दिशा मिळेल, स्थानिक संस्कृतीला व्यासपीठ मिळेल आणि मोहोळचा आवाज जिल्ह्याच्या पलीकडे जाईल.वर्षानुवर्षे “कधी होणार?” असा प्रश्न विचारणाऱ्या मोहोळकरांसाठी ही भेट आशेची नांदी ठरली आहे.



