
१८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तघरफोडी, जबरी चोरी, दुचाकी चोरीसह गांजाविरोधात कारवाई; दोन सराईत आरोपींना अटक

सोलापूर, दि. १२ सप्टेंबर ( प्रतिनिधी ) सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासह अंमली पदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी घरफोडीचे २, जबरी चोरीचे २ आणि मोटारसायकल चोरीचा १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणून १६ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच अंमली पदार्थविरोधी कारवाईत २ किलो ११ ग्रॅम गांजा व एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पुणे जिल्ह्यातील गुन्ह्यांतील आरोपी सोलापुरात येणार असल्याची माहितीदि. १० सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे यांच्या तपास पथकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील घरफोडी व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यश ऊर्फ सोन्या ज्ञानेश्वर खलसे (वय २२) हा सोलापूर शहरात येणार असल्याची माहिती मिळाली.पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून जेलरोड पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे तसेच सासवड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथील मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला.या कारवाईत ८१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १० ग्रॅम चांदीचे दागिने आणि एक युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण १२ लाख ८९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.१६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी; जबरी चोरीचा छडादि. १ सप्टेंबर रोजी रात्री अशोक चौक परिसरात पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हिसकावून नेली होती. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि उमेश पवार यांनी सलग आठ दिवसांत घटनास्थळापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावरील तब्बल १६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.या तपासातून संघर्ष उत्तम वाघमारे (वय २२, रा. काठोडा, जि. बीड) याचा माग काढण्यात आला. त्याला दि. ९ सप्टेंबर रोजी परभणी येथून ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्याने त्याचा साथीदार रोहन तुकाराम थोरात याच्यासोबत अशोक चौक परिसरात सोन्याची चैन हिसकावल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात २५ ग्रॅम सोन्याची चैन, ५ ग्रॅम सोन्याचे गणपती पेंडल आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य, असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.२ किलो ११ ग्रॅम गांजा जप्त; एक आरोपी ताब्यातदि. १० सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे व त्यांचे पथक शहरात गस्त घालत असताना जुनी मिल चाळ परिसरात दोन व्यक्ती अॅक्सेस स्कूटीवरून संशयास्पदरीत्या जाताना दिसल्या.पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी शिवाजी धनु राठोड (वय ६०, रा. गणपत तांडा, बक्षी हिप्परगा, सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार संतोष राम चव्हाण (रा. मुळेगाव तांडा, सोलापूर) हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाला.राठोड याच्याकडील MH-13-FE-1473 क्रमांकाच्या अॅक्सेस स्कूटीच्या हँडलजवळील कापडी पिशवीत गांजा सदृश्य पदार्थ आढळला. फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून तपासणी केल्यानंतर तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईत २ किलो ११ ग्रॅम गांजा आणि स्कूटी असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीड वर्षांपासून प्रलंबित मंगळसूत्र चोरीचा गुन्हाही उघडकीसदि. १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील सोन्याच्या दोन वाट्या चोरीला गेल्या होत्या.या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली.आरोपी अजय संजय पंडीत (वय २१, रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि राहुल माणिक आमराव (वय ३०, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हे वारंवार ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हते. अखेर सातत्याने त्यांच्या ठावठिकाणाचा मागोवा घेत दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दोघांना पकडण्यात आले.त्यांच्याकडून चोरी केलेल्या मंगळसूत्रातील दोन सोन्याच्या वाट्या, किंमत ४५ हजार रुपये, हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींच्या नावावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.दोन्ही आरोपींचा गुन्हेगारी इतिहासअजय पंडीत याच्याविरुद्ध एमआयडीसी सिन्नर, सिन्नर ग्रामीण, करमाळा आणि सदर बझार पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसांनी दिली आहे. तर राहुल आमराव याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, करमाळा आणि सदर बझार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.एकाच कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगतया संपूर्ण कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकांनी घरफोडीचे २, जबरी चोरीचे २ आणि मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा उघडकीस आणून १६ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याशिवाय एनडीपीएस कायद्यान्वये केलेल्या कारवाईत २ किलो ११ ग्रॅम गांजा व मोटारसायकल असा १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त दिलीप पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे, शैलेश खेडकर, शंकर धायगुडे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे त्यांच्या तपास पथकातील विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अभिजीत पवार, विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सूरज पवार, वसिम शेख, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे,अजिंक्य माने, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, सायबरचे प्रकाश गायकवाड,मच्छिंद्र राठोड,आशिष राठोड व बाळासाहेब काळे आणि खंडू कांबळे यांनी केली आहे


